प्रशासनाचे स्थायीला पत्र : आज महापालिकेत बैठकप्रदीप भाकरे । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील दैनंदिन स्वच्छतेच्या कंत्राटाचा तिढा अधिक गडद झाला असून मनपा प्रशासनाविरूद्ध स्थायी समिती, असे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमिवर प्रशासनाने स्थायी समितीला एक पत्र पाठविले असून स्थायी समिती सभापतींनी त्यांच्या स्तरावर सर्व संबंधितांची बैठक बोलावून व सविस्तर चर्चा करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करणे सोईचे ठरेल, असे सूचविले आहे. अद्याप कंत्राटाच्या अटी-शर्ती स्थायी समोर ठेवण्यात आल्या नाहीत. या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाचे अक्षरश: ‘सॅन्डविच’झाले आहे. दरम्यान अन्य महापालिका व नगरपालिकांमध्येही मल्टिनॅशनल कंपनीचा प्रयोग फारसा समाधानकारक नसल्याचे मत प्रशासनाने पिंपरी चिंचवडच्या महापालिका आयुक्तांच्या हवाल्याने व्यक्त केले आहे. पूर्वीच्या प्रभागनिहाय कंत्राट पद्धतीऐवजी शहरातील दैनंदिन स्वच्छतेचे कोट्यवधींचे कंत्राट मल्टिनॅशनल कंपनीला देण्याचा ठराव तुषार भारतीय यांच्या नेतृत्वातील स्थायी समितीने मे महिन्यात पारित केला आहे. त्याअनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी पुन्हा एक ठराव देऊन या कंत्राटासंदर्भात अटी-शर्ती स्थायी समितीच्या पुढील बैठकीत ठेवाव्यात, अशी सूचना स्थायी सभापती तुषार भारतीय यांनी केली आहे. या कंत्राटावरुन सत्ताधिशांमध्येच अंतर्गत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. दैनंदिन स्वच्छतेचा कंत्राट प्रभागनिहाय ऐवजी मल्टिनॅशनल कंपनीला देण्यासंदर्भातील ठराव पारित करत असताना भारतीय यांनी स्वपक्षातील नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे तब्बल ३५ नगरसेवकांनी पत्र दिले असून त्या पत्रांना फारसे महत्त्व न दिल्याने भाजपसह अन्य पक्षातील काही नगरसेवकांमध्ये असंतोष उफाळण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अर्ध्या कार्यक्षेत्रात ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ कंपनी कार्यरत असली तरी दैनंदिन स्वच्छता त्यांचेकडून केली जात नाही, याबाबत एकाच कंत्राटदारामार्फत साफसफाई केल्यास अनेक अडचणी निर्माण होतील. त्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे कंत्राटदार असणे आवश्यक आहे. व तसे करणेच योग्य राहिल, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी व्यक्त केल्याचे स्थायी समितीला पाठविलेल्या पत्रात प्रशासनाने म्हटले आहे. सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकतापिंपरी चिंचवड, नवी मुंबई, चाळीसगाव आणि तासगाव येथिल आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाच्या अनुषंगाने यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. यादृष्टीने स्थायी समिती सभापतींनी त्यांच्या स्तरावर सर्व संबंधितांची बैठक आयोजित करावी, त्यात सविस्तर चर्चा केल्यास प्रशासनाला पुढील कारवाई करणे सोयीचे ठरेल, असे पत्र प्रशासनाने स्थायीला पाठविले आहे.सुनील देशमुखांच्या भूमिकेकडे लक्षस्वच्छतेच्या कंत्राटावरुन भाजप विरुद्ध भाजप आणि नवी डायमंड गँग जन्माला आली असताना स्थानिक आमदार सुनील देशमुख यांच्या भूमिकेकडे भाजपच्याच नव्हे तर अन्य नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या व महिन्याकाठी मनपाच्या कामकाजाचा अभ्यासपूर्ण आढावा घेणाऱ्या आ.देशमुखांनी स्वच्छतेच्या कंत्राटाबाबत किमानपक्षी भाजपच्या नगरसेवकांची भूमिका जाणून घेऊन मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्वच्छतेच्या कंत्राटावरुन सुनील देशमुखांच्या नेतृत्वात महापालिकेत काम करणाऱ्या भाजपक्षाच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत सुंदोपसुंदी निर्माण झाल्याने आता त्यांनीच पुढाकार घेऊन हा तिढा सोडवावा,अशी अपेक्षा भाजपसह अन्यपक्षीय नगरसेवकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.
कंपनीला स्वच्छता कंत्राट देणे अडचणीचेच !
By admin | Published: July 08, 2017 12:23 AM