अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन व विस्तार भवनाच्या परिसरात महिलेसोबतची संगत एका कर्मचाऱ्याला भोवली आहे. या प्रकरणी त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश १० नोव्हेंबर रोजी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. त्यामुळे विद्यापीठात ‘ती’ महिला आणली गेली, हे आता प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागात कनिष्ठ साहाय्यक प्रमोद धंदर असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कुलसचिव डॉ. देशमुख यांच्या आदेशानुसार २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते ५.३० यादरम्यान विद्यापीठाच्या आजीवन विस्तार विभागात बाहेरील एक महिला आणली गेली होती, अशी तक्रार युवा सेनेचे जिल्हा समन्वयक राहुल माटोडे यांनी दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. मोना चिमोटे यांच्या अध्यक्षतेत या प्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी चौकशी समिती गठित केली होती.
या त्रिसदस्यीय समितीने नोंदविलेल्या जबाबानुसार कनिष्ठ साहाय्यक प्रमोद धंदर यांच्याकडून आजीवन अध्ययन व विस्तार विभागात अश्लील प्रकार घडल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे. झालेला हा प्रकार विद्यापीठाच्या प्रतिमेचे अवमूल्यन करणारा आणि विद्यार्थी, पालक यांच्या विश्वासाला तडा देणारा आहे, असे अहवालात नमूद आहे. त्यामुळे धंदर यांची गैरवर्तणूक लक्षात घेता त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील भाग २ मधील नियम ४ च्या तरतुदी अंतर्गत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा २०१६ चे कलम १४ (६) (ख) नुसार ११ नोव्हेंबरपासून माध्यान्हपूर्व निलंबित करण्यात येत आहे.