वनोजा बाग / अंजनगाव सुर्जी : अल उमर जिनिंग अँड प्रेसिंगच्या संचालकाने अकोटच्या शेतकऱ्यांचे १० लक्ष १० हजार ३७० रुपये थकविल्याचे कारण समोर करून अल उमर जिनिंगचा परवाना रद्द करण्याचा बाजार समितीने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, ज्यांनी तक्रार केली ते शेतकरी नसून, व्यापारी असल्याचे अल उमर जिनिंगचे संचालक उमर यांनी म्हटले आहे. २८ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्या निर्णयामुळे आपल्या व्यापारावर परिणाम झाल्याने मानहानीचा दावाही दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोट येथील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केल्यानंतर बाजार समितीमार्फत अल उमर जिनिंगच्या संचालकावर कारवाईचा बडगा उगारला होता. परवाना रद्द करण्याचे आदेशही पारित केले होते. सदर तक्रार संचालक मंडळाचे हितसंबंध जोपासण्यासाठी बाजार समिती सचिवाने त्यांच्या दबावाखाली दाखल केली असून, काही दिवसांपूर्वी सहा शेतकऱ्यांसोबत थकीत झालेले संपूर्ण व्यवहार माझेकडून संपुष्टात आले. दुसऱ्या प्रकरणात हा व्यवहार व्यापाऱ्यांमार्फत व्यापाऱ्यांशी झालेला व्यवहार असताना व त्याचे सर्वच पुरावे जे की बँक स्टेटमेंटचे पुरावे आहेत, जे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार दर्शवीतात ते पुरविले असताना, त्या प्रकरणाचे पुरावे सादर केले असताना तथाकथित शेतकऱ्यांनी आयकर वाचविण्यासाठी बाजार समिती व वांधा समितीसमोर दिशाभूल करणारे दस्तऐवज प्रस्तुत केले आहेत. या बाबतीत बाजार समितीला लिखित स्वरुपात खुलासा दिल्यावरही बाजार समितीची कारवाई विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचे ते म्हणाले.
प्रतिक्रिया
व्यापारी असो वा शेतकरी, बाजार समितीने जिनिंग प्रेसिंग संचालकाचे परवाना रद्द करण्याची कार्यवाही कायदा व अधिनियमानुसार केली.
- गजानन नवघरे,
सचिव, बाजार समिती अंजनगाव सुर्जी
------