अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटींचा घोटाळा झाल्याच्या खोट्या व बिनबुडाच्या जाहिराती प्रसिध्द होत असून, शहरात व तालुक्यात त्याचे बॅनर्स लावणाऱ्या इसमाविरुद्ध बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सोमवारी सिटी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली.
सदर प्रकरण चौकशीत ठेवले असून महापालिकेने ते बॅनर काढल्याची माहिती ठाणेदार राहुल आठवले यांनी दिली. खोट्या अफवांवर विश्वास ठेवून नये, गुंतवणुकीसंदर्भात बँकेत कुठलाही घोटाळा झालेला नसून, संपूर्ण गुंतवणुकीचे ऑडिटसुद्धा झाले आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून ती इतर राष्ट्रीयीकृत, राज्य सहकारी बँक व व्यापारी बँकेत सुरक्षित ठेवलेली आहे. त्यामुळे सर्व ठेवीदारांचे पैसे आपल्या बँकेत सुरक्षित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बँकेची बदनामी करणाऱ्या इसमावर गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी तक्रार सोमवारी नोंदविण्यात आली. २० मार्च २०२१ रोजी बँकेविरुद्ध एका शेतकऱ्याने तक्रार नोंदविली असून, त्याची चौकशी पोलीस करीत आहेत.