चांदूरबाजार (अमरावती) - अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध चांदूर बाजार ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न यांसह अन्य गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. चांदूर बाजारचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बच्चू कडूंसह पाच जणांवर भांदविच्या कलम ३०७, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारीला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नगर परिषद सदस्य गोपाल तिरमारे घरी असताना, तेथे बच्चू कडू यांच्यासह विशाल बंड, सनी सवले, शिशिर ठाकरे, सागर मोहोड हे पाच जण आले. त्यांनी तिरमारे यांना शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार करण्यासाठी त्याच रात्री पोलीस ठाण्यात जात असताना स्थानिक किसान चौकात याच 5 जणांनी लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार गोपाल तिरमारे यांनी चांदूर बाजार पोलिसांत केली आहे.
राजकीय वादातून घटनागेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू व गोपाल तिरमारे यांच्यात वाद सुरू आहे. यातूनच ही घटना घडल्याची चर्चा आहे. गोपाल तिरमारे यांनी आमदार कडू यांच्याविरुद्ध निवडणुकीत खोटे शपथपत्र सादर केल्याची तक्रार आसेगाव पोलिसांत केली होती. यावरून चांदूर बाजार प्रथमश्रेणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कडू यांना दिले आहेत. गोपाल तिरमारे हे एकेकाळी कडू यांचे खंदे समर्थक होते.