अमरावती : अंबादेवी आणि एकवीरा देवीबाबत भक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल झाली आहे. गुरुवारी महापालिकेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयुक्तांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलाविली होती. दोन दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील बैठकीत आयुक्तांनी अंबादेवी आणि एकवीरादेवी मंदिराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. दोन्ही देवस्थानांच्या जागेची मोजमाप केल्याचे उदारहण त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार आयुक्त गुडेवार यांच्या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचा आरोप करीत हिंदूत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त गुडेवार यांनी शिष्टमंडळासमोर स्पष्टीकरण देऊन क्षमा मागितली आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख आकाश मानकर यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)अंबादेवी व एकवीरा देवीबाबत भावना दुखावणारे वक्तव्य केल्याची तक्रार आहे. याची चौकशी करून शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. - वैजनाथ लटपटे,पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे.
मनपा आयुक्तांविरोधात तक्रार
By admin | Published: September 07, 2015 12:34 AM