नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत महिला वनकर्मचारी सुरक्षित नसल्याच्या घटना तक्रारीवरून आता पुढे येऊ लागल्या आहेत. ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याविरुद्ध एका महिला वनकर्मचाऱ्याने तक्रार केली असून त्यावर विशाखा समितीच्या चौकशी अहवालाची कारवाईसाठी प्रतीक्षा आहे. दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर ही पाचवी तक्रार आहे.
गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्याविरुद्ध या महिला कर्मचाऱ्याने दीड महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली. मानसिक त्रास देत कारणे दाखवा नोटीस आणि तत्कालीन निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी त्यांच्या सांगण्यावरून निलंबित केले. त्यातूनच गर्भपात झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. यासंदर्भात अमरावती येथील व्याघ्र प्रकल्पाच्या महिला सहायक वनसंरक्षक अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशाखा समितीकडून चौकशी केली जात असल्याचे सहायक वनसंरक्षक मच्छिंद्र थिगडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुसरीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांचे स्थानांतरण झाल्याने मंगळवारी त्यांना निरोप देण्यात आला.
चौराकुंड प्रकरण थंडबस्त्यात?
सिपना वन्यजीव विभागांतर्गत चौराकुंड येथील शासकीय कर्तव्यावर दीड वर्षांपासून गैरहजर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष खुळसामविरुद्ध कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावरील महिला कर्मचाऱ्याशी संबंधित घटनेकडे आता दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
कुठे गेल्या विशाखा समित्या?
मेळघाटात विशाखा समित्यांकडे तक्रार दिल्यावर सुनावणी न झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेल्या विशाखा समितीकडे तक्रार करण्याचा नियम आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील समितीने ही चौकशी करायला हवी. परंतु, या सर्व बाबीला बगल देऊन वनाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेल्या विशाखा समित्या त्याचा न्यायनिवाडा करीत आहेत. यातून तक्रारकर्त्या महिलांना न्याय मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिरालाल चौधरी यांच्याविरुद्ध एका महिला कर्मचाऱ्याने तक्रार दिली. हे प्रकरण चौकशीसाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आले असून विशाखा समितीचा अहवाल येणे आहे.
- मच्छिंद्र थिगडे, सहायक वनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा
महिलांवरील अन्यायाचा तात्काळ न्यायनिवाडा करून दोषींविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासाठी मेळघाटात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संघटना कटिबद्ध आहे.
- इंद्रजित बारस्कर, प्रदेश महासचिव, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, नागपूर