प्रहारचा उपक्रम : तहसील ते मंत्रालय स्तरावरील २७० तक्रारी दाखल अमरावती : सामान्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा न्याय निवाडा करण्यासाठी सोमवारी प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या जनता दरबारात मंत्रालयातील सर्वच विभागाकडील तब्बल २७० तक्रारी शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी दाखल केल्या आहेत.सामान्य जनतेला अनेक कामांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी समस्याकरिता सर्वच शासकीय कार्यालय ते मंत्रालयात वर्षानुवर्र्षे चकरा मारायला लावण्याची वृत्ती दिवसे दिवस वाढत चालली आहे. ही प्रवृत्ती कायमची बंद करण्यासाठी प्रहार संघटनेने १८ एप्रिल रोजी आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा जनतेच्या प्रश्नासाठी जनता दरबार घेतला. यामध्ये शहर व ग्रामीण भागातील अनेक त्रस्त नागरिकांनी मंत्रालयातील जवळपास ४० विभागांत न्याय मागणीचे प्रलंबित असलेल्या दस्तऐवजासह तक्रारी व गऱ्हाणी या जनता दरबारात सादर केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तहसील ते मंत्रालय स्तरावरील प्रकरणाचा समावेश आहे. या सर्व तक्रारी प्रहार संघटनेने एका अर्जाच्या नमुन्यात स्वीकारल्या आहेत. यापैकी ५० टक्के तक्रारी ह्या स्थानिक पातळीवरील असल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निकाली काढण्यात आल्याचे आ. बच्चू कडू यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. या जनता दरबारात जिल्हा व शहरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.यावेळी प्रहारचे शहरध्यक्ष धीरज जयस्वाल, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसु, चंदू खेडकर, शंभू मालठाणे, जोगेंद्र मोहोड, रोशन देशमुख, गजू घुगुल, भारत उगले, मुकेश घुंडीयाल व पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्राप्त तक्रारींपैकी अर्ध्या तक्रारींचा निपटारा केला आहे. काही प्रकरणांची छाननी करून दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायद्याचे उल्लंघन आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, अशी प्रकरणे निकाली काढण्याबाबत संबंधितांना मुदत दिली जाईल. त्यानंतर दिलेल्या मुदतीत या प्रकरणांचा न्यायनिवाडा न केल्यास अशांना प्रहार स्टाईलने धडा शिकविला जाईल- बच्चू कडू, आमदार, अचलपूर
बच्चू कडूंच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस
By admin | Published: April 19, 2016 12:08 AM