बच्चू कडू : सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रचंड नाराजी, कंत्राटदाराला दंड ठोठावण्याचे निर्देश
चांदूर बाजार : तालुक्यातील १३ व अचलपूर तालुक्यातील ३ अशा १६ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या बोर्डी नाला मध्यम प्रकल्प वेळेत पूर्ण करा, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे समाधानकारक दिसून आली नसून, प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी प्रकल्पाची शुक्रवारी पाहणी केल्यानंतर दिले.
ना. कडू यांनी बोर्डी नाल्यातील सांडवा, धरण, घळभरणी, धरणात झालेल्या अंशतः जलसाठ्याची पाहणी केली. या पाहणीदरम्यान बोरगाव मोहना, तुळजापूर गढी रस्त्यावरील पुच्छ कालव्याच्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले नसल्याचे त्यांना आढळून आले.
या प्रकल्पाची क्षमता १८.१९ दलघमी इतकी आहे. जून २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर ४,१२६ हेक्टर जमिनीला थेट सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता ना. कडू यांची ही पाहणी व निर्देशांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान तुळजापूर गढी येथील शेतकऱ्यांना शेतात जाणारा प्रत्यक्ष रस्ता व पांदण रस्त्यांची पाहणी करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. कंत्राटदाराबाबत ग्रामस्थांनी आरोप केल्याने कंत्राटदाराविरूद्ध दंडात्मक कारवाईचा आदेश त्यांनी दिला. तुळजापूर गढी गावातील शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे सुमारे ३०० एकर जमीन पिकांपासून वंचित राहून नुकसान शेतकऱ्यांनाच भोगावे लागणार असल्याचे बघून बच्चू कडू यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या पाहणी दरम्यान जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता सुनील राठी, सार्वजिनक बांधकाम विभाग अचलपूरचे कार्यकारी अभियंता सी.यू. मेहेत्रे, उपअभियंता एम.पी. भेंडे, सहायक अभियंता श्रेणी नीरज माळवे, प्रहारचे दीपक भोंगाडे आदी उपस्थित होते.