अमरावती : अचलपूर एस. टी. बसस्थानक परिसरात आवश्यक सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिले.
अचलपूर बस स्थानकाची पाहणी ना. कडू यांनी केली. अचलपूर व चांदूर बाजार येथील बसस्थानक परिसरातील कामांचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता शीतल गोंड, विभागीय अभियंता सुशांत पाटील, विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे, वास्तुशास्त्रज्ञ रवींद्र राजूरकर आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री कडू म्हणाले की, बसस्थानकात येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक त्या सुविधांची उभारणी वेळेत करण्यात यावी. परिसरात गर्दी होऊन रहदारीची कोंडी होऊ नये, यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. बसेस सुटण्याची जागा, त्यांचे आत येण्याचे व बाहेर जाण्याचे मार्ग, प्रवाशांना येण्या-जाण्याची जागा, इतर वाहनांसाठी पार्किंग आदींचे परिपूर्ण नियोजन करून त्यानुसार योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अचलपूर व चांदूर बाजार बसस्थानकांतील विविध विकासकामांची माहिती त्यांनी विभाग नियंत्रक व अभियंत्यांकडून घेतली व नियोजित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.