रणजित पाटील : पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा शुभारंभअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन राज्याचे गृह, शहरी विकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय आणि सांसदीय कार्य राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी केले. विद्यापीठातील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठ परिसरातील अॅथेलेटीक ट्रॅकजवळ हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू मोहन खेडकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयुडी संचालक आर.एस. सपकाळ, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, वित्त व लेखाधिकारी शशिकांत आस्वले, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर व कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे उपस्थित होते. रणजित पाटील पुढे म्हणाले, यावर्षी पाण्याची समस्या बिकट आहे. त्यामुळे पाणी वापराचे नियोजन सर्वांना करावयाचे आहे. विद्यापीठाने २०-२५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून जलकुंभ निर्मितीचे कार्य हाती घेतले, ही बाब अभिनंदनीय आहे. विद्यापीठात संत गाडगेबाबांच्या नावाने अध्यासनाची परिपूर्ण इमारत बांधण्याकरिता ५.५० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. गाडगेबाबा आमचे दैवत आहेत. त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करू, उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे हा मुद्दा लावून धरू, असे आश्वासन त्यांनी दिले. श्रीकांत देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.चार लक्ष लीटर क्षमता असलेली पाण्याच्या टाकीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. प्रास्ताविक भाषणातून कुलसचिव अजय देशमुख यांनी कार्यक्रमा विषयी माहिती दिली. संचालन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे यांनी केले. कार्यक्रमाला दिनेश सूर्यवंशी, एम.टी. देशमुख, डी.जी. भंडागे, अमरसिंह राठोड, रवी वैद्य, अधिष्ठाता मार्कस लाकडे, विद्यापीठाचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विद्यापीठाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करेन
By admin | Published: November 25, 2015 12:49 AM