चांदूर बाजार : तालुक्यातील गणोजा येथे जाणारा सोनोरी-गणोजा मुख्य रस्त्याची १५ वर्षांपासून अतिशय वाईट अवस्था आहे. यातील दोन किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वारंवार निवेदने व विनंती अर्ज देऊनही लोकप्रतीनिधी व प्रशासनाने आजवर दखल घेतली नाही. यामुळे ३० जूनला गणोजा येथील रस्ता व पुलाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा सोनोरीचे उपसरपंच रोहिदास गजभिये यांनी प्रशासनाला दिला आहे.
गणोजा-आष्टोली पांदण रस्त्यावर पाच वर्षांपूर्वी मातीकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर नाल्याला वाट देण्यासाठी रस्ता मध्येच खणून त्याठिकाणी दोन सिमेंट पाईप टाकण्यात आले. हा रस्ता तयार झाल्यानंतर पहिल्याच पुरात टाकलेल्या पायल्यांसह रस्ता ही उखडून गेला. तेव्हापासून आजतागायत प्रशासनाने या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. गणोजा येथील ६० टक्के शेतकऱ्यांची शेती या रस्त्यावर आहे. दरवर्षीच शेतकऱ्यांना या रस्त्याने त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर पक्क्या पुलाची मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी दरवर्षी तुराट्या व माती टाकून स्वत:च तात्पुरता रस्ता तयार करून घेतात. पुलाच्या मागणीसाठी रोहिदास गजभिये यांनी २०१६-१७ मध्ये तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने त्वरित रस्ता व पूल दुरुस्तीचे आश्वासन दिले. त्याला आता चार ते पाच वर्षे झाली आहेत. ग्रामपंचायतीचा ठराव, स्मरणपत्रांचाही उपयोग झाला नाही. या मुद्द्यावर येत्या २ ऑगस्टपासून सोनोरी गावाजवळ बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. यात ग्रामस्थदेखील सहभागी होतील, असे पालकमंत्री, राज्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, तहसीलदार व ब्राम्हणवाडा थडी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.