वसतिगृहे केव्हा सुरू होणार? आदिवासी विद्यार्थ्यांचा सवाल, कोरोनात शिक्षणापासून वंचित असल्याचे शल्य
अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली आहे. मात्र, वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थी घरीच ‘लॉक’ आहेत. दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थी वैतागले असून शाळा-महाविद्यालये सुरू होऊन ऑफलाईन शिक्षण मिळावे, अशी आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
कोरोनामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षाविना पुढील वर्गात प्रवेश होणार असल्याने अभ्यासू विद्यार्थ्यांचे यात मोठे शैक्षणिक नुकसान मानले जात आहे. दहावी, बारावीचे मूल्यांकन झाल्यानंतरच निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतरच उत्तीर्ण होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना अकरावी अथवा पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशानंतर वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश मिळवावा लागेल. अमरावती विभागांतर्गत धारणी, पांढरकवडा, पुसद, अकोला, किनवट, कळमनुरी व औरंगाबाद या सातही एकात्मिक प्रकल्प कार्यालय अधिनस्थ १०४ शासकीय वसतिगृहांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश निश्चित केला आहे.
-----------------------
सात प्रकल्पांतील वसतिगृहाच्या प्रवेशावर एक नजर
शासकीय वसतिगृहाची संख्या : १०४
वसतिगृह मंजूर प्रवेश क्षमता : १३२१५
ईमारत मंज़ूर प्रवेश क्षमता : १३१२४
जुने प्रवेशित विद्यार्थिसंख्या : ६३३१
नवीन प्रवेशित विद्यार्थी संख्या : ५०१४
एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्या :११३४५
मंजूर प्रवेश क्षमतेनुसार रिक्त जागा : १८७०
इमारत क्षमतेनुसार रिक्त जागा : १७७९
-------------------
दहावी, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घेतले. मात्र, शालेय शिक्षण विभागाने परीक्षाच रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता परीक्षाविना दहावी, बारावीचा निकाल हा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना अनुभव येणार आहे. मात्र, दऱ्याखोऱ्यात, वस्ती, वाड्यावर वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृहात प्रवेश घेता येईल, असे चित्र आहे.
--------------------
कोट
अमरावती ‘ट्रायबल’ विभागातंर्गत सातही एकात्मिक प्रकल्पात वसतिगृहात सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ५०१४ आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. दहावी, बारावीच्या निकालानंतर पुन्हा वसतिगृहात प्रवेश दिला जाईल.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.