अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे शनिवारी एका ५५ वर्षीय रुग्णांच्या मणक्यातील ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया करून २.५ सीएम बाय ३ सीएमची गाठ काढण्यात आली. न्यूरोसर्जरीमधील ही जटिल शस्त्रक्रिया असून १४० पैकी एक पुरुष तर १८० महिलांमध्ये एका महिलामध्येच मणक्यातील ट्युमर आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील ५५ वर्षीय पुरुष हा मणक्याच्या त्रासामुळे उपचारासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे भरती झाला होता. या रुग्णांच्या मणक्यामध्ये ट्युमर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. फार कमी लोकांमध्ये मणक्यामध्ये ट्युमर आढळून येतो. यावर वेळीच शस्त्रक्रिया झाली नाहीतर पक्षाघात होण्याची शक्यता असते. हा ट्युमर मणक्यातील नसांमध्ये गुंतलेला असल्यामुळे शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती.
तब्बल तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये २.५ सीएम बाय ३ सीएमची गाठ काढण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधार होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ही शस्त्रक्रिया एमएस डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जन डॉ. अमोल ढगे, डॉ. स्वरूप गांधी, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. नंदिनी देशपांडे यांनी केली. यावेळी परिचारिका दीपाली देशमुख, तेजल बोंडगे ,कोमल खडे, जीवन जाधव, अभिजित उदयकर यांनीदेखील शस्त्रक्रियेत मोलाची योगदान होते.