जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विना अनुदान धोरण बंद करण्याची मागणी अमरावती : राज्यात राबविण्यात येत असलेले विनाअनुदानित धोरण त्वरित रद्द करावे, २३ आॅक्टोबर २०१३ चा शासन आदेश रद्द करून चिपळूनकर समितीप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करावीत, शिक्षकांना अतिरिीक्त ठरविण्याची प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करावी यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी जिल्ह्यात शाळा बंदची हाक दिली होती. या बंदला सर्वत्र संमिश्र प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, शिक्षण क्षेत्र समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना विविध मागण्याचे निवेदन सोपविले आहे.शिक्षण क्षेत्र समन्वय समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन २००४ पासून बंद केलेले अनुदान पूर्वलक्षी प्रभावाने सहाव्या वेतन आयोगावर सुरू करावे व थकबाकीसह ते त्यांना विनाविलंब देण्यात यावे. शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, २० नोव्हेबर २०१३ चा तुकड्यांचा सुधारीत आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच तुकड्यांना मान्यता द्यावी. आरटीई कायद्यानुसार शिक्षकांच्या वाढीव पदांसह अंमलबजावणी व्हावी व कला क्रीडा शिक्षकांवर होणारा अन्याय दुर करावा, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील १०० टक्के अनुदानास निकषपात्र असलेल्या तुकड्यांना त्वरित अनुदान द्यावे. या तुकड्यावरील शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे, शालार्थ प्रणालीच्या अंमलबजावणीतील त्रुटीमुळे शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा नियमित होत नाही. कोणत्याही परिस्थितीत वेतन नियमित एक तारखेला करण्याचे आदेश देण्यात यावे. विनाअनुदानित तुकड्यावरील विद्यार्थी संख्या सर्व बाबींसाठी ग्राह्य धरण्यात यावी. अशा एकूण ११ मागण्यांसाठी राज्यभर शाळा बंदची हाक १८ शिक्षक संघटनानी दिली होती. आंदोलनाचा हा पहिल्या टप्पा होता. दरम्यान सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या जिल्हा शाखेतर्फे देण्यात आले. सदर निवेदन राज्यशासनाला पाठविण्याची कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या संगीता शिंदे, विकास दिवे, संजय बुरघाटे, दिलीप कडू, शरद तिरमारे, ललीत चौधरी, प्रदीप नानोटे, प्रवीण गुल्हाने, बाळासाहेब वानखडे, सागर वाघमारे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शाळा बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: January 13, 2015 10:52 PM