अमरावती : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मेळघाट मतदारसंघात सध्या युती, आघाडीत मतदारसंघ कुणाला सुटतो, याबाबतचे चित्र अस्पष्ट आहे. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. आघाडी व युतीचा निर्णय काय लागतो, याकरिता इच्छुकांची 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील मेळघाट मतदारसंघात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. इच्छुकांनी त्याचमुळे सावध भूमिका घेतली आहे. सध्या मेळघाट मतदारसंघात काँग्रेसकडून केवलराम काळे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकुमार पटेल हे दोन माजी आमदार निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. दुसरीकडे भाजपतर्फे विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदारांचे पुत्र रमेश मावस्कर आदी इच्छुक आहेत. शिवसेनेकडून सध्या तरी कुणीही प्रबळ दावेदारी केलेली नाही. मात्र, युती न झाल्यास आणि भाजपकडून एखाद्याचा हिरमोड झाल्यास अशावेळी यापैकी कुणीही सेनेक डून लढू शकतो, अशी चर्चा सध्या मेळघाट मतदारसंघात आहे.
मेळघाट मतदारसंघात कुपोषण, स्थलांतर, बेरोजगारी, वीज, पाणी, रस्ते आरोग्य शिक्षण यांसारख्या पायाभूत समस्या कायम आहेत. मतदारसंघाची व्याप्ती फार मोठी असून, यामध्ये धारणी, चिखलदरा आणि अचलपूर तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे. मेळघाट म्हटल्यावर धारणी आणि चिखलदरा हे दोन आदिवासीबहुल तालुके नजरेसमोर येत असले तरी विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी अचलपूर तालुक्यातील गैरआदिवासी भागातील मतदान निर्णायक ठरते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .मेळघाट मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, मागील निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाने हिसकावला. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण, यावरच बरीचशी गणिते आखली जात आहेत.मुद्दा उमेदवाराचाच !मेळघाटच्या विकासाचा मुद्दा अधांतरीच आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने विकासाच्या मुद्याला बगल देत सध्या इच्छुक सर्व उमेदवारांकडून याकडे डोळेझाक केली जात आहे. परिणामी सध्या विकासकामापेक्षा उमेदवार कोण, यावर चर्चा रंगली आहे. राज्यभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्षांतर करीत असताना मेळघाट मतदारसंघातसुद्धा हाच प्रयोग राबविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.