मोर्शी : आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या कारभाराची चौकशी करून, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या आयोजक कंत्राटदार कंपनीवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेच्यावतीने देण्यात आला. तसे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आरोग्य विभागात २८ फेब्रुवारी रोजी गट (क) पदावरील नियुक्तीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ज्या खाजगी कंपनीला परीक्षेचे कंत्राट दिले, त्या कंपनीने नियोजनशून्य कारभारातून मोठ्या प्रमाणात घोळ केला. परीक्षा घेण्याआधीच पेपरचे सील फुटलेले होते. स्वाक्षरी न घेता विद्यार्थी परीक्षेला गेल्यानंतर सेंटरवर त्यांचे प्रवेश क्रमांक डेस्कवर नमूद केले नव्हते. काही सेंटरवर एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसविण्यात आले होते.
आरोग्य विभागाचा पेपर रद्द करून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता एमपीएससीमार्फत घेण्यात यावा तसेच यानंतरच्या गट (क) साठी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत पारदर्शकपणे घेण्यात येऊन त्या खासगी कंपनीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा छत्रपती शिवाजी मैत्री संघटनेचे अध्यक्ष श्रणीत राऊत, अंकित ठवळी, विनीत उबाळे, अजय वानखडे, अमोल निस्वादे, अनिकेत थेटे, नितीन गंजीवाले, प्रशांत राऊत, अभिजित मोहने, वैष्णव चिंचोळकर, समीर खान, प्रज्वल बिडकर, मंगेश निपाने, रंजित उईके, विशाल गुल्हाने, संघपाल बोरकर, प्रतीक उघडे, युवराज कोहळे, सौरभ डोळस, सागर राऊत, राजेशसिंह टांक, जयेश घोडकी, करण मोहने यांनी दिला आहे.