परतवाडा (अमरावती) : अमरावती प्रादेशिक वन विभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याने चांगलाच गोंधळ घातला.
सदर महिला कर्मचारी कार्यालयात लेखापाल म्हणून कार्यरत आहे. विशिष्ट प्रकारचे पेय घेण्याची तिला सवय आहे. यात तिचा नेहमीच कार्यालयात तोल जायचा. ४ मे रोजी त्या महिला कर्मचाऱ्याचा अधिकच तोल जाऊन गोंधळ उडाल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांनी तिची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला.
तिला महिला वनरक्षकासमवेत रुग्णालयात पाठविले. पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यादरम्यान तिने एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबतही वाद घातला. त्यांच्या अंगावरही ती धावून गेली. तिने त्यांच्यावर हात उगारण्याचाही प्रयत्न केला. गोंधळ घालणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे पतिदेवही अमरावतीहून अचलपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
एक महिला कर्मचारी असल्याने तिचे वर्तन सुधारावे म्हणून धाक दाखविण्याच्या हेतुने तिची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण, इथेही तिने गोंधळ घातल्यामुळे पेच निर्माण झाल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वृत्त लिहिस्तोवर कुठलाही समेट घडून आलेला नव्हता. घडलेल्या प्रकाराला आरएफओ प्रदीप भड यांनी दुजोरा दिला.