लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वाढीव खर्चासाठी दुसऱ्यांदा सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात घोडचुका आढळल्याने गुरुवारी विद्यापीठाच्या विशेष अधिसभेत चांगलेच घमासान झाले. नुटाचे प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी, विवेक देशमुख यांनी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागावर ताशेरे ओढले. पुरवणी अर्थसंकल्प चुकीसह मान्य करण्याचा पायंडा पाडणार, असे त्यांनी ठणकावून सांगितल्यामुळे पीठासीन अध्यक्षांपुढे पेच निर्माण झाला होता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत १० नोव्हेंबर रोजी पुरवणी अर्थसंकल्प पत्रासाठी अधिसभा बोलाविण्यात आली होती. परंतु, या अधिसभेत अनेक चुका पुढे आल्याने विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागास १५ दिवसांची चूक सुधारण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी विद्यापीठाची विशेष अधिसभा बोलाविण्यात आली. सभेच्या सुरुवातीला प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर दुपारच्या सत्रात पुरवणी अर्थसंकल्पावर चर्चा झाली. यावेळी नुटाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सुधारित पुरवणी अर्थसंकल्पातही मोठ्या चुका असल्याचे सांगितले. मूळ अर्थसंकल्पात शून्य खर्च दर्शविण्यात आला होता. परंतु पुरवणीमध्ये ५ लाख २५ हजार दर्शविण्यात आला आहे. किरकोळ खर्चाचे दरदेखील प्रचंड वाढले. किरकोळ खर्चात नॅक समितीच्या दौऱ्यातील खर्च घुसविण्यात आला. प्रत्यक्षात नॅकसाठी वेगळ्या निधीची तरतूद असताना असे का घडले, असा प्रश्न त्यांनी केला.पीजी डिप्लोमा कोर्सदेखील पुरवणी अर्थसंकल्पात दुरुस्ती करताना शब्दांची फेरफार केली आहे. परफाॅर्मिंग आर्टसाठी झालेल्या खर्चाचे स्पष्टीकरण विचित्र असल्याचे ते म्हणाले. मायक्रोबॉलॉजीसाठी वाढीव खर्च दोन लाखांवरून चार लाख दाखविण्यात आला. साहित्याची ने-आण व अन्य प्रकारचा खर्च यात दर्शविला आहे. परफॉर्मिंग आर्टसाठीदेखील १ लाख ८१ हजार खर्च पाच लाखांवर वाढविण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा शैक्षणिक विभागासाठी १५ लाखांची तरतूद असताना राज्य शासनाकडून निधी मिळणार असल्याचे गृहीत धरून वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात शासनाने निधीच मंजूर केला नसताना विद्यापीठाने हा निधी कसा मंजूर केला, असा प्रश्न त्यांनी केला.चर्चेमध्ये प्रा.विवेक देशमुख, उत्पल टोंगो, ॲड. अतुल भारद्वाज, प्रदीप देशपांडे, डॉ.बी.आर.वाघमारे, नितीन खर्चे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, अर्थसंकल्प मंजूर करावा, अशी विनंती पीठासीन सभापती प्रभारी कुलगुरू डॉ. एफ.सी. रघुवंशी यांनी केली. परंतु, चुकीचा असल्याने तो मान्य तरी कसा करायचा, असा प्रश्न सदस्यांनी केला.
२२ टक्क्यांची मर्यादा ओलांडली पुरवणी अर्थसंकल्प पत्रात पुस्ती करताना केवळ २२ टक्के वाढीव खर्च करता येत असल्याचे प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले. परंतु, यात २२ टक्क्यापेक्षा अधिक वाढीव खर्च करण्यात आला आहे. हा खर्च कसा करण्यात आला, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन होणार असल्याचेही ते म्हणाले.
परफॉर्मिंग ऑर्टमध्ये गोंधळपुरवणी अर्थसंकल्प पत्रिकेत परफॉर्मिंग आर्ट या विभागांतर्गत मोठा घोळ निदर्शनास आला. यात कंत्राटी कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, मल्टिटास्किंग स्टॉफ, शैक्षणिक उपक्रम अंतर्गत प्रचंड वाढीव खर्च दाखविण्यात आला आहे. हा खर्च वाढविताना वित्त व लेखा विभागाने समान स्पष्टीकरण दिल्याचे प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले.
४५ लाखांचे वातानुकूलित यंत्र विद्यापीठाच्या पुरवणी अर्थसंकल्प पत्रात २२ वातानुकुलित यंत्र खरेदीसाठी ४५ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. ही तरतूद पुढच्या अर्थसंकल्पात करता आली असती, असे सिनेट सदस्य डॉ. बी.आर. वाघमारे यांनी सांगितले. यामुळे तातडीने ही तरतूद पुरवणीत का केली, असा सवाल त्यांनी केला.