संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:45 PM2023-07-31T12:45:39+5:302023-07-31T12:49:01+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
अमरावती : संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. अमरावती येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलं असून संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजीही केली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. नुकतेच महात्मा गांधी यांच्यासंदर्भातही संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापले असताना आता त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भातही विधान केले. या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसताहेत. संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु यावेळी महात्मा गांधी यांच्यावरील विधानाने काँग्रेससह सामान्यांमध्येही तीव्र असंतोष उफाळला असून राज्यभरातून आंदोलनाद्वारे त्यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे.
आज (दि. ३१) अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केले. यात आमदरा यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले. यावेळी भिडेंना अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी उचलून धरली. अटक न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे.