राज्यपालांंच्या फोटोला जोडे मारले, धोतराची केली होळी; अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 02:52 PM2022-11-21T14:52:44+5:302022-11-21T15:06:54+5:30
राज्यपाल कोश्यारी व भाजपचे सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा निषेध
मनीष तसरे
अमरावती : शहर जिल्हा युवक काँग्रेस व अमरावती जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते, सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध धोतर फाडून व फोटोला जोडे मारून आज राजकमल चौक येथे आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. राज्यपाल कोश्यारी यांनी एका समारंभात भाषण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने झाले अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. जनतेमध्ये निर्माण झालेला प्रचंड असंतोष सोमवारी या निदर्शने व निषेध कार्यक्रमाच्या वतीने दिसून आला.
राजकमल चौक येथे सकाळी ११ वाजता माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर तथा प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, प्रदेश चिटणीस आसिफ तव्वक्कल, युवक काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष नीलेश गुहे, युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष पंकज मोरे,अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष शक्ती राठोड, महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ.अंजली ठाकरे, यांच्या उपस्थितीत यानिषेध मोर्चाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी राज्यपाल कोश्यारी व भाजपचे सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा धिक्कार करत धोतर फाडून व फोटोला जोडे मारून आक्रोश व्यक्त केला.
कोश्यारी हे राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. ते सातत्याने महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि महापुरुषांची अवहेलना करीत आहेत आणि असताना देखील भाजपकडून त्यांच्या विरोधात निषेधाचा एक शब्दसुद्धा येत नाही. किंबहूना यांची पाठराखण केल्या जाते, असे म्हणत संताप व्यक्त करण्यात आला. यासह सत्ताधारी शिंदे गटाकडून सुद्धा याबाबतीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न होणे आणि त्यांच्या राजीनाम्याची व बारखास्ताची मागणी न करणे हे त्यांचे छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिंदेगटाला सुद्धा अतिशय लज्जास्पद असल्याची टीका आंदोलनकरर्त्यांनी केली. या निषेध कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यपाल कोश्यारी यांना बरखास्त करा, तसेच भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.