अमरावती : केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात आणला आहे. अदानी उद्योग समुहामधे एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले. एलआयसीचे २९ कोटी गुंतवणूकदार व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४९ कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का? अशी भिती निर्माण झाली आहे. मोदी सरकारच्या धोरणाविरोधात सोमवारी येथील श्याम चौकात स्टेट बँकेसमोर प्रचंड निदर्शने करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, शहराध्यक्ष बबलु शेखावत यांनी केले.
अदानी समूहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बँकांनी मिळून तब्बल ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. मोदी सरकारने काही खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. अदानी उद्योग समुहातिल गैरकारभाराची चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवत आहे. सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे. यावेळी "केंद्रातील मोदी सरकारचा निषेध असो" "अदानी चोर है" "चौकीदार चोर है" "जनतेच्या पैशाला संरक्षण मिळावे" "भाजपा हटाव देश बचाव" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलु शेखावत, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख यांच्या नेतृत्वात तसेच आमदार बळवंत वानखडे, माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.