कोरडा दुष्काळ, वाढीव घर टॅक्स, नोटीस जाळल्या; आंदोलनांनी गाजला मंगळवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:12 PM2023-08-30T12:12:06+5:302023-08-30T12:15:32+5:30
मालमत्ता वाढीव कर, काँग्रेसचा हल्लाबोल : 'प्रहार'चा मोर्चा : शेतकऱ्यांचा आक्रोश
अमरावती : महापालिकेतील भ्रष्टाचार, लादलेली भरमसाट मालमत्ता करवाढ, साफसफाईत हलगर्जी आणि वाढलेला डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप, रस्त्यांवरील खड्डे आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी काँग्रेसने महापालिकेवर मोर्चा काढला. आयुक्त देवीदास पवार यांना निवेदन सादर करून भाजपच्या वाढीव मालमत्ता स्थगितीचे काय झाले, याविषयी जाब विचारला.
वाढीव घर टॅक्सबाबत नागरिकांना बजावण्यात येणाऱ्या नोटिशीवरही काँग्रेसने संताप व्यक्त केला. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव मालमत्ता कराला स्थगिती दिली होती. ते फक्त नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी होते काय? या महागाईच्या काळात हा टॅक्स सर्वसामान्य नागरिकांसोबत काँग्रेस पक्षालादेखील मान्य नाही, अशी भूमिका शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी घेतली.
जनतेच्या शिरावर नवनवीन टॅक्सचे ओझे, मालमत्ता करात अवाढव्य वाढ, प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार, साफसफाईअभावी अस्वच्छतेच्या ढिगारावर महानगर असून डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचा विळखा शहराला बसलेला आहे. रस्त्यांवर जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य उभारले गेले आहे. महापालिकेत कमिशनराज बोकाळले आहे. वाढीव मालमत्ता कर रद्द करावा, शहरात मोकाट जनावरे आणि मोकाट श्वानांच्या हैदोसावर अंकुश लावावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.
अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आत्मक्लेश ते मंत्रालयात हल्लाबोल आंदोलन @ १०३
काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, अॅड. दिलीप एडतकर, किशोर बोरकर, भैया पवार, आसिफ तव्वकल, सुनीता भेले, वंदना कंगाले, अशोक डोंगरे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रहारने केली नोटीसची होळी
अमरावती महापालिका हद्दीत मालमत्ता करवाढीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मंगळवारी आंदोलन केले. महापालिकेवर धडक मोर्चा काढत करवाढीच्या नोटीसची होळी केली. मनपा आयुक्तांना एक महिन्याचा अल्टिमेटम निवेदनातून दिला.
प्रहारने आंदोलनातून महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली. यावेळी बडनेरातील गौतम बुद्ध वार्ड (फुकटनगर) अधिकृत झोपडपट्टी घोषित करावे, बडनेरा शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ, नवी वस्ती येथील बस स्थानक ते दुर्गापूर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती आदी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी संपर्कप्रमुख गोलू पाटील, उमेश मेश्राम, श्याम इंगळे, सुधीर मानके, विक्रम जाधव, नंदू वानखडे, मनीष पवार, अंकुश पंचवटे, कुणाल खंडारे, मुकेश गोसावी, बंडू मेश्राम, पीयूष गेडाम, विजय मेश्राम, सिद्धांत बोरकर, गौरव मेश्राम, साहिल शेंडे, स्वप्निल मेश्राम, अमन राऊत आदी उपस्थित होते.
जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा. पाणंद रस्ते दुरुस्त करा. २४ तास वीजपुरवठा आदी मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा काढला.
संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख नितीन कदम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हा कचेरीवर बैलबंडी, ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी सायन्स कोअर मैदानातून आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मार्चेकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विविध लक्षवेधी फलकांच्या माध्यमातून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
दरम्यान, यावेळी नितीन कदम यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मोर्चात करुणा कदम, अक्षय धुळस, हर्षा कावरे, हर्षल कावरे, प्रवीण मोहोड, राजेश वानखडे, अमित अढाऊ, परवेज कदम, निशा कदम, स्मृती धुळस, वैष्णवी कदम, सोनाली कदम, चंदा बोडखे, प्रफुल्ल तऱ्हाडे, शुभम उभाड, बाबूजी तऱ्हाळ, किरण गुडधे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर व नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाला आझाद पार्टी, भीम ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा देऊन मोर्चात सहभाग घेतला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही कदम यांनी शासन व प्रशासनाला दिला.