अमरावती : शहर काॅग्रेसद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘शर्म करो’ हे आंदोलन सोमवारी दुपारी सुरु असतांनाच त्याचवेळी अचानक भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनीदेखील प्रत्युत्तर देत जोरदार नारेबाजी केली. दोन्ही गट आमनेसामने येत असल्याने वातावरणात तणाव वाढला होता. दरम्यान पोलिसांनी कठडे लावून मोर्चेबंदी केली.
जम्मू कश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात पंतप्रधान मोदीविरोधात गंभीर आरोप केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षाच्या निर्देशानूसार शहर कॉग्रेसद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर कॉग्रेसद्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरु असतांना भाजप युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री बादल कुळकर्णी, शहराध्यक्ष प्रणित सोनी यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्त्यांनी तिथे धडक दिली. दोन्ही गट समोरासमोर घोषणाबाजी करत असल्याने तणावसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती निवळली.
या आंदोलनात कॉग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, भैया पवार, विजय वानखडे, अनिल देशमुख, किशोेर देशमुख, अभिनंदन पेंढारी, वैभव देशमुख, राजीव भेले, नंदकिशोर कुटे, सुजाता झाडे, शोभा शिंदे, जयश्री वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.