‘पदवीधर’साठी ऐनवेळी ठरणार काँग्रेसचा उमेदवार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 03:04 PM2023-01-10T15:04:30+5:302023-01-10T15:13:18+5:30
इच्छुकांमध्ये संभ्रम कायम
अमरावती : इतर निवडणुकांप्रमाणे अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसचा उमेदवार ऐनवेळीच ठरणार असल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम कायम आहे. सोमवारी काँग्रेसची विभागीय बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन मंथन बैठकीत काँग्रेस उमेदवाराची घोषणा मात्र झाली नाही. उलट काँग्रेसकडून सात उमेदवार इच्छुक असून १२ जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे ९ जानेवारी रोजी अमरावती येथे विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख,आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सचिव देवानंद पवार, आमदार बळवंत वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे, शहराध्यक्ष बबलू शेखावत, दिलीप एडतकर, किशोर बोरकर, मिलिंद चिमोटे आदीसह पाचही जिल्हाध्यक्ष व निवडक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आगामी निवडणुकीचे अनुषंगाने नाना पटोले यांनी उपस्थितांची मते जाणून घेतली. ही निवडणूक काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबत लढणार आहे. यामध्ये पदवीधरांचे प्रश्न,आणि जुनी पेन्शन योजना यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबध्द असल्याचे पटोले यांनी सांगितले.
काँग्रेसकडे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी ७ जण इच्छुक आहेत. यामध्ये माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, डॉ.सुधीर ढोणे, मिलिंद चिमोटे, भैय्यासाहेब मेटकर, श्याम प्रजापती, डॉ. लाेढा यांचा समावेश असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. यावेळी विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, गिरीश कराळे, अभिजित देवके, महेंद्र गैलवार, बिटू मंगरोळे, भागवत खांडे, दयाराम काळे आदीसह अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा येथील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुनील देशमुख यांचा नकार
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या नावाला संमती दर्शविली आहे. मात्र, मी 'पदवीधर'ची निवडणूक लढणार नसून अमरावती विधानसभा लढविणार, असे डॉ. सुनील देशमुख यांनी स्पष्ट केले.