तिवसा (अमरावती) : तिवसा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेची काहीवेळ तारांबळ उडाली होती. पेट्रोलपंप चौक ते तहसील कार्यालय असे दोन किमी अंतर पायी चालत शेतकरी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय गाठले. मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा या पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्याची पीक आणेवारी ४७ पैसे आली आहे. वरखेड मंडळातील २५ गावांतील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली.
या २५ गावांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी. पिकविमा भरपाई लवकर देण्यात यावी, या मागण्यांसाठी तिवसा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने धरणे, निदर्शने व निषेध व चक्काजाम आंदोलन महामार्गावर करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिंदे- फडणवीस सरकारचा भाषणातून समाचार घेतला.