लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसा काँग्रेसचे मिरविणारे नेते रात्र होताच भाजपचे होतात. असे किती दिवस चालणार, असा सवाल करीत काँग्रेसचे नेते विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची भूमिका मंगळवारच्या पत्रपरिषदेत स्पष्ट केली.काँगे्रसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्या निवडणुकीत प्रचारात असलेले काँगे्रसचे तत्कालीन शहर अध्यक्ष विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यासोबतच त्यांनी काँगे्रसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यानांही लक्ष्य केले. निष्ठावान कार्यकर्ते पक्षापासून का दुरावत जात आहे, याचा ऊहापोह विश्वासरावांनी करून शहर काँग्रेसला घरचा आहेर दिला.काँग्रसचे पदाधिकारी भाजप नेत्यांना कार्यक्रमात बोलावतात. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडतात. पक्ष याची नोंद घेत नाही. केवळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे अन् पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्यासमवेत फोटो काढणे हे पक्षकार्य समजावे काय, असा सवाल देशमुख यांनी केला. पक्षाच्या शहराध्यक्षांकडे दिवसभर कुणीच कामासाठी जात नाहीत. स्वत: निष्क्रिय राहायचे आणि अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडायचे. मुंबई, दिल्लीशी संबंध राखून पदे टिकवून ठेवायची, हे काँग्रेससाठी घातक असल्याचे मतप्रदर्शन विश्वासराव देशमुख यांनी केले.बबलू देशमूख, पुष्पाताई बोंडे व आता अनिल माधोगडिया यांना कोणी पाडले? पक्षाचे बहुमत असताना पोटे निवडून येतातच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांना किती काळ मूर्ख बनविणार? काँग्रेस पक्षाचे राजकारण बिघडले असल्याने आम्ही दबंग नेते बाहेर आलो आहोत. आम्ही पक्षाचे निष्ठावान पाईक आहोत. आमचे रक्त काँग्रेसचे आहे. आमच्यावर कुठलाही डाग नाही. स्वच्छ प्रतिमा आहे. म्हणून आम्ही उमेदवारी मागतो आहोत. पक्षाने तिकीट न दिल्यास विचार करू, असे स्पष्ट करून आगामी काळात घमासान होणार असल्याचे संकेत देशमुख यांनी दिले. पत्रपरिषदेला हरिभाऊ दातेराव, मिर्झा जुबेर, जावेद अली, श्यामबाबू रावलानी, सत्येंद्रसिंग रोटे, सलीम मोबाइल आदी उपस्थित होते.काँग्रेसचे नेते भाजपच्या दावणीलास्वाभिमान महत्त्वाचा आहे. पण, अलीकडे हाच स्वाभिमान हरविला आहे. पक्षाचे नेते भाजपाच्या दावणीला बांधले आहे. काँग्रेसला उमेदवार सापडला नाही म्हणून राणा यांना पाठिंबा द्यावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. मतदारांची दिशाभूल केल्याने नेत्यांना मतदारांच्या संतापाला समोरे जावे लागते. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या विरोधात कणखरपणे समोर येण्याचे आवाहन केले आहे. आमाचा पवित्राही त्यानुसारच आहे, असेही विश्वासराव देशमुख यांनी स्पष्ट केले.
दिवसा काँग्रेसचे, रात्री भाजपचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:44 AM
शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसा काँग्रेसचे मिरविणारे नेते रात्र होताच भाजपचे होतात. असे किती दिवस चालणार, असा सवाल करीत काँग्रेसचे नेते विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची भूमिका मंगळवारच्या पत्रपरिषदेत स्पष्ट केली.
ठळक मुद्देपत्रपरिषद : विश्वासराव देशमुखांचा प्रहार, उमेदवारीचाही दावा