वरूड (अमरावती) : सहकारात प्रतिष्ठित केलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेला, तर भाजपमध्येही गटबाजी झाली आहे. यामध्ये काँग्रेस (ठाकरे गट) आणि भाजपचे सहकार पॅनेल तसेच काँग्रेस (कराळे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी परिवर्तन पॅनेल आमनेसामने आहे. यासाठी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
२३ नोव्हेंबर १९३१ मध्ये स्थापन झालेल्या या बाजार समितीचे सहकारातील अन्य गटांनी नेतृत्व केले असले तरी बहुतांश वेळा काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचीच सत्ता राहिली आहे. दहा वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता होती. त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस हर्षवर्धन देशमुख यांच्या गटाने सत्ता मिळविली. कॉंग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे गटाकडेही दहा वर्षे कार्यकाळ राहिला आहे. बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी ५४ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. यामध्ये उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर म्हणजेच २० एप्रिलनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सहकारात गटा-तटात विभागलेल्या पक्षांनी आता मतदारांच्या भेटीगाठी, गृहभेटी सुरू केल्या आहेत. बाजार समितीमध्ये १७१७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ६०६ मतदार ग्रामपंचायत मतदारसंघात, ६६७ सेवा सोसायटी, ६९ मापारी हमाल आणि ३७५ व्यापारी मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्षात अटीतटीच्या व अस्तित्वाच्या लढतीत कोण बाजी मारणार हे ३० एप्रिलच्या मतदानानंतर ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या सहभागाने होईल विकास
शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेली बाजार समिती आता आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली आहे. बाजार समितीपासून सर्वसामान्य शेतकरी कोसोदूर आहे. त्यामुळे उत्पादित कृषी मालावर आधारित प्रकल्प सुरू केल्यास बाजार समितीला सुगीचे दिवस येतील, असे माजी जि.प सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी सांगितले.
उत्पन्नाचे स्रोत वाढविणार केव्हा?
पुर्वी जिनिंग प्रेसिंग, भाजीपाला फळे, संत्रा, कापूस मार्केट अशा विविध मार्गाने बाजार समितीला सेस मिळायचा. परंतु शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती केली. सोबतच अन्य स्रोतही बंद केल्याने बाजार समिती आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढविणे महत्त्वाचे असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी सांगितले.
कॉंग्रत्चा एक गट भाजपासोबत, दुसरा राष्ट्रवादीकडे!
तालुक्यात कॉंग्रेसचे दोन गट असून नरेशचंद्र ठाकरे गटाने भाजपचे खा. अनिल बोंडे गटाशी हातमिळवणी केलेली आहे तर गिरीश कराळे गट हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार यांच्या राकाँ गटासोबत आहे. भाजपतदेखील गटबाजी असून एक गट नाराज असल्याचा फायदा राष्ट्रवादीच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे.