जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसचे सामूहिक हनुमान चालिसा पठण
By गणेश वासनिक | Published: September 23, 2022 07:18 PM2022-09-23T19:18:02+5:302022-09-23T19:20:42+5:30
जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसने सामूहिक हनुमान चालिसा पठण करून आंदोलन केले.
अमरावती : मागील दोन वर्षांपासून बंद असलेली अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दोन्ही खासदारांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी शुक्रवारी काँग्रेसच्यावतीने मॉडेल रेल्वे स्थानकावर सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले. माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात हे अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.
गेल्या ८ वर्षांत केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारद्वारे जिल्ह्यात कोणतीही नव्या रेल्वेची सुरुवात केली नाही, असा आरोप काँग्रेसने केला. जबलपूर रेल्वे गाडी बंद होईपर्यंत दोन्ही खासदारांना, मोदी सरकार आणि रेल्वे मंत्र्यांना जाग आली नाही. नागरिकांच्या विकासात्मक प्रश्नांवर अग्रक्रमाने भूमिका घेण्यासाठी सद्बुद्धी येवो, याकरिता हनुमान चरणी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करून साकडे घातले. जबलपूर रेल्वे सुरू न केल्यास काँग्रेस पक्षातर्फे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर उपस्थित होते.
विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, भैय्या पवार, किशोर बोरकर, अनिल तरडेजा यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्री यांना स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे यांच्यामार्फत जबलपूर रेल्वे सुरू केल्याप्रकरणी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संजय वाघ, विनोद मोदी, कोमल बोथरा, मुन्ना राठोड, अशोक डोंगरे, शोभा शिंदे, फिरोज खान, भालचंद्र घोंगडे, राजू भेले, विजय वानखडे, डॉ. मातीन अहेमद, अभिनंदन पेंढारी, सुनील पडोळे, मनोज मिश्रा, विकास तिवारी, अतुल कालबेंडे, अनिल देशमुख, योगेश बुंदेले, भैय्यासाहेब निचळ, धीरज हिवसे, अमर भेरडे, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, कीर्तीमाला चौधरी, अविनाश सोलंकी, सचिन निकम, जनार्धन वानखडे आदी उपस्थित होते.
'त्या' बैठकीला दोन्ही खासदार गैरहजर
जबलपूर एक्स्प्रेस का रद्द करण्यात आली? याबाबत माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी रेल्वेच्या वरिष्ठांशी विचारणा केली असता, जून महिन्यात या गाडीविषयी बैठक घेण्यात आली होती. तेव्हा अमरावती जिल्ह्याचे दोन्ही खासदार या बैठकीला गैरहजर होते. अमरावती-जबलपूर गाडी ही व्यावसायिकदृष्ट्या नफ्यात चालणारी असल्याचे सर्वश्रुत आहे. तरीही नव्या गाडीसाठी प्रयत्न करण्याऐवजी आहे ती गाडीसुद्धा बंद करण्याचे पातक केंद्रातील मोदी सरकारने व अमरावती जिल्याच्या दोन्ही खासदारांनी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.