अमरावती- केंद्रातील मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर, सोनियाजींना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही, असे ठणकावून सांगत काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस दिल्यानंतर आज देशभरात काँग्रेस आक्रमक झाली असून सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. अमरावतीतही काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा काँग्रेसच्यावतीने अमरावती विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून इर्विन चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. ठाकूर यांनी माध्यमाशी संवाद साधला.
केंद्रातील मोदी सरकार ने जे काही चालवलं आहे, कित्येक राज्यांमध्ये ईडीच्या भरोशावर ऑपरेशन लोटस सुरू केलेलं आहे. आज आमच्या नेत्या सोनियाजी यांची प्रकृती ठीक नसताना, त्या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना या निर्दयी माणसाने चौकशीला बोलावलं आहे, असा आसूड ॲड. ठाकूर यांनी मोदी विरोधात लगावला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा या मोदी सरकारच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. पण ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही, असे आक्रमतेने सांगत त्यांनी इर्विन चौकात जोरदार घोषणा दिल्या. तसेच खूप झाली दडपशाही, देशात हवी लोकशाही, बंद करा बंद करा, तपास यंत्रणांचा गैरवापर बंद करा, अशा आशयाचे फलक घेऊन हे आंदोलन करण्यात आले. अमरावती जिल्हा काँग्रेस ग्रामीण व शहरच्यावतीने आज अमरावती येथील इर्विन चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान अमरावती विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देण्यात आले.