अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर; नोटाला २७ मते, १२०० ठरली मते बाद
By जितेंद्र दखने | Published: June 6, 2024 09:39 PM2024-06-06T21:39:59+5:302024-06-06T21:40:27+5:30
गत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे.
अमरावती : लोकसभा मतदारसंघासाठी गत २६ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार ४ जून रोजी येथील लोकशाही भवनात पार पडली. या मतमोजणीत अंतिम मतदानाचे चित्र स्पष्ट झाले आहे.
रिंगणार असलेल्या ३७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सर्वाधिक मते काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना २ हजार १३५ मते मिळालीत तर भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना १ हजार ७३४ आणि प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांनी ३१५ मते मिळाली आहेत. या तीन उमेदवारांशिवाय रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर ८० आणि बसपाचे संजयकुमार गाडगे यांना २८ मते घेतली. अन्य सर्व अपक्ष उमेदवारांना मात्र कुठे १ ते ६ अशाप्रकारे मते पोस्टल बॅलेटद्वारे मिळाले आहेत. विशेष म्हणजे ५ हजार ५७४ पैकी १२०० मते बाद ठरली असून नोटाला २७ मते पडली आहेत.
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार शासकीय अधिकारी, कर्मचारी असलेल्या मतदारांनीदेखील या सुविधेचा लाभ घेत मतदान केले. अमरावती लोकसभा मतदारसंघात ५ हजार ५७४ मतदारांपैकी ४ हजार ३७४ टपाली मतदारांनी आपला हक्क बजावला. यातील १ हजार २०० हजार मते बाद झाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार बळवंत वानखडे यांना २ हजार १३५, तर भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांना १ हजार ७३४ टपाली मते मिळाली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत टपाली मतदारांनीही काँग्रेसला अधिक पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर भाजप उमेदवार दुसऱ्यास्थानी व प्रहारचे उमेदवार दिनेश बूब हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी ८० तर बसपाचे संजयकुमार गाडगे यांना २८ टपाली मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे अपक्ष असलेल्या उमेदवारांपैकी ६ जणांना प्रत्येकी १ मत, ९ उमेदवारांना प्रत्येकी २ मते, तिघांना प्रत्येकी ३, एकाला ४, दोन उमेदवारांना प्रत्येकी ५ आणि सहा उमेदवारांना प्रत्येकी १ या प्रमाणे पोस्टल बॅलेटद्वारे मते मिळाली आहेत. सोबतच २७ मतदारांनी नोटाला मतदान केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी
गत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. यासंदर्भात विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने निवेदन, आंदोलन, बेमुदत काम बंद आंदोलनसुद्धा केले आहे. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये राज्यकर्त्याविरोधात तीव्र नाराजीचा सूर आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही पोस्टल बॅलेट मतदानातून ही नाराजी दिसून आली.