अमरावती : राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ गुजरातला जात असलेल्या आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे. राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते, त्यावेळी अशीच चौकशी केली होती? का असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड यशोमती ठाकूर यांनी गुजरातपोलिसांना केला.
सुरतला रवाना होत असताना आमदार यशोमती ठाकूर यांचे वाहन गुजरात पोलिसांनी अडवले. त्यावेळी पोलिसांनी लाइव्ह स्ट्रिमींग कॅमेराधारक दोन कर्मचारी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासमोर उभे केले आणि याचं थेट लाइव्ह गांधीनगर मध्ये होतंय, तिथे तुम्हाला बघतायत असं पोलिसांनी सांगितले. आमचा नेता गुजरातला आहे, त्यांच्या समर्थनासाठी आम्ही जाऊ शकत नाही का? काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, असं म्हणत ॲड यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या वाहनास जाऊ दिले.
भारतासारख्या देशात जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठी अशा पद्धतीची अरेरावी होत असेल तर ही एकूणच बाब गंभीर आहे. राज्यातील सत्तांतरासाठी गुजरातने बंडखोर आमदारांना रेड कार्पेट टाकून सुरक्षा दिली आणि आज काँग्रेसच्या आमदारांना रोकटोक केली जात आहे, याचा निषेध ही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.