वरूड (अमरावती) : पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. वरूड येथे आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अनिल बोंडे यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह यावेळी उपस्थित होते.
सन २०२२ पर्यंत शेतकरी स्वयंभू झाला पाहिजे. १५ वर्षे सत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी राजेशाही थाटात राहून स्वत: मालक आणि जनता गुलाम बनविली. त्यांनी शाळा-महाविद्यालये, कारखाने काढले. परंतु, या साडेचार वर्षांच्या काळात आमच्या सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही, असा दावा त्यांनी केला. आम्ही आमच्या वाहनावरील लाल दिवे हटविले आणि जनतेला राजा समजून काम करायला लागलो. म्हणून विकासाचा टक्का वाढला. महाराजस्व अभियानासारखी शिबिरे सुरू करून ‘शासन आपल्या दारी’ आणल्याचे खोत म्हणाले.
वरूडच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे, उपाध्यक्ष मनोज गुल्हाने, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे, वसुधा बोंडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, गटविकास अधिकारी विजयसिंह राठोड, सुभाष बोपटे, माजी बालकल्याण सभापती अर्चना मुुरुमकर, पं.स. सदस्य अर्चना तुमराम, प्रमोद खासबागे, नलिनी रक्षे, शशिकांत उमेकर, इंद्रभूषण सोंडेंसह आदी उपस्थित होते.कोल्हे दाम्पत्याचा सत्कार
मेळघाटात सामाजिक कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्यासह झटामझीरी, पिंपळखुटा या ग्रामपंचायतींना वॉटर कप स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांचा शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.