दिलासा : कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप, वर्षभराकरिता कुटुंब दत्तकअमरावती : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यध्य राहुल गांधी यांनी ३० एप्रिल २०१५ रोजी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि चांदूररेल्वे या दोन तालुक्यांतील शेतकरी आत्महत्याग्रस्त नऊ कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या भावना प्रत्यक्ष जाणून घेतल्या होत्या. या कुटुंबांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून या नऊ कुटुंबांना कर्जातून मुक्ती दिलेली आहे. या कुटुंबांना शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, महापौर चरणजितकौर नंदा, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार केवराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, मनपा पक्षनेता बबलू शेखावत, विलास महल्ले, किशोर बोरकर, शहरध्यक्ष संजय अकर्ते, प्रल्हाद ठाकरे, अविनाश मार्डीकर, उषा उताणे, आदींच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या वारसाना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वितरित करून एका वर्षाकरिता ही कुटुंबे दत्तक घेतली आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एप्रिल महिन्यात वाढत्या तापमानातही धामणगाव रेल्वे आणि चांदूररेल्वे या दोन तालुक्यांतील नऊ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यावेळी राहुल गांधी तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मदत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिलासा दिल्याचे बबलू देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती गिरीश कराळे, सदस्य प्रवीण घुईखेडकर, उमेश केने वनमाला खडके, संगीता सवई, मंदा गवई, प्रवीण सवाई, बिटू मंगराळे, भागवत खांडे, सुरेश आळे, दयाराम काळे, बबलू बोबडे, समीर देशमुख, अमोल इंगळे, पकंज मोरे व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलू देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन किशोर बोरकर यांनी केले.या शेतकऱ्यांना केले कर्जमुक्तधामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी नीलेश वहिले, अंबादास वहिले, शहापूर येथील किशोर कांबळे, रामगाव येथील कचरू तुपसुंदरे, आणि चांदूररेल्वे तालुक्यातील राजना येथील मारोती नेवारे, टोंगलाबाद येथील माणिक ठवकर, रामदास अडिकणे, शंकर अडिकणे, अशोक सातपैसे या शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील वारसाना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.या पदाधिकाऱ्यांनी घेतले कुटुंब दत्तकआत्महत्याग्रस्त नऊ कुटुंबांना वर्षभरासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दत्तक घेतले आहे. यामध्ये टोंगलाबाद येथील माणिक ठवकर, रामदास अडिकणे, शंकर अडिकणे, अशोक सातपैसे या चार कुटुंबांना आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार रावसाहेब शेखावत, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके यांनी तर मारोती नेवारे, कचरू तुपसुंदरे या दोन कुटुंबांना वीरेंद्र जगताप यांनी व आर्वीचे अमर काळे यांनी दत्तक घेतले. किशोर कांबळे यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमदार यशोमती ठाकूर यांनी स्वीकारली. तसेच नीलेश वाळके, अंबादास वहिले या दोन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हा ग्रामीण कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दत्तक घेतले आहेत.
आत्महत्याग्रस्त नऊ कुटुंबांची काँग्रेसने केली कर्जातून मुक्ती
By admin | Published: June 21, 2015 12:37 AM