लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही अमरावतीकरांना एकदिवसाआड व अवेळी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधी स्वत:ला विकासपुरुष म्हणवून घेतात. सत्ता त्यांची आहे, तर शहरातील रखडलेल्या अमृत योजना व भुयारी गटार योजना का पूर्ण झाली नाही, असा सवाल करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसने शुक्रवारी मजीप्रावर धडक दिली. अधिकाऱ्यांशी यावेळी दोन तास चर्चा करून जाब विचारण्यात आला. यामुळे वातावरण तापले होते.माझ्या कार्यकाळात केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांनी यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत १०५.६० कोटी रुपयांची योजना अमरावतीकरिता मंजूर केली होती. यापैकी १४.२९ कोटी रुपयांचीच कामे राहिली होती. सद्यस्थितीत अप्पर वर्धा धरणामध्ये शहराकरिता ५८.३ दलघमी पाणी आरक्षित असूनसुद्धा शहरामध्ये प्रचंड पाणीटंचाई आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मूळ योजनेचे नामकरण अमृत योजना करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शहरात नव्याने पाण्याच्या टाक्या व जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित होते. ती कामेही आॅक्टोबर २०१८ पुर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना पूर्ण झाली नाही, असा जाब रावसाहेब शेखावत यांनी कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार व उपअभियंता सतीश बक्षी यांना केला. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य अकार्यक्षमतेमुळे व दिरंगाईमुळे शहरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ८३ कोटींच्या निविदेमधून कंत्राटदाराने लावलेल्या ११२ एअर व्हॉल्व्हपैकी ८७ निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. कंत्राटदाराला यासंदर्भात खुलासा मागविण्यात आला. मात्र, कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, यावर अधिकाºयांनी चुप्पी साधली. यावेळी माजी महापौर विलास इंगोले, महापालिका विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, शहर काँग्रेस अध्यक्ष किशोर बोरकर यांनीसुद्धा अपूर्ण कामांवर अधिकाºयांना धारेवर धरले. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.महिला काँग्रेस अध्यक्ष देवयानी कुर्वे, वसंतराव साऊरकर, माजी महापौर वंदना कंगाले, अभिनंदन पेंढारी, पुरुषोत्तम मुंधडा, राजू भेले, राहूल तायडे, सलीम मरावाळे, जयश्री वानखडे, तुजाज पहेलवान, बंडू हिवसे, सुरेंद्र देशमुख, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, राजाभाऊ चौधरी, संतोष देशमुख, अब्दुल वलीद, कुंदा अनासाने, किरण मेहरे यांच्यासह अनेक पदाधिकाºयांची उपस्थिती होती.भुयारी गटार योजना केव्हा पूर्ण होणार?पावसाळा तोंडावर असताना भुयारी गटार योजना अपूर्ण असल्याने नाल्यांमध्ये पाणी साचणार असून, विविध प्रकारच्या आजारांचा प्रकोप होऊ शकतो. याला जबाबदार कोण, असा प्रश्न रावसाहेब शेखावत यांनी विचारला. पहिल्या टप्प्यात एकूण २४६४० घरे योजनेला जोडणे अपेक्षित असतानाही आतापर्यंत फक्त ७६० घरे जोडण्यात आली. उर्वरीत घरे या योजनेला केव्हा जोडणार, असा सवाल त्यांचा होता.
काँग्रेसची मजिप्रावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:57 AM
धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही अमरावतीकरांना एकदिवसाआड व अवेळी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधी स्वत:ला विकासपुरुष म्हणवून घेतात.
ठळक मुद्देरावसाहेब शेखावत यांचे नेतृत्व : कारभार ढासळल्याचा आरोप