पत्रपरिषद : बबलू देशमुख यांची माहितीअमरावती : केंद्र आणि राज्यातील भाजपा शिवसेना सरकारच्या जनहितविरोधी कारभाराविरोधात ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जवळपास १५ हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. तपूर्वी जिल्हा काँगे्रस पक्षाचे पदाधिकाऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात त्यांनी बैठक घेऊन मोर्चासंदर्भात विस्तृत चर्चा केली. पुढे बोलताना देशमुख म्हणालेत केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन दीड वर्ष झाले. राज्यातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असताना भाजपा सरकारने एकही निर्णय जनहिताचा घेतला नाही.भाजपा सरकारने सर्वत्र नापिकी आणि दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या हातचे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे सोयाबिनला हमी भाव तर दिलाच नाही. आतातर सोयाबीनच राहिले नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाहेक्टरी २५ हजार रूपये आर्थीक मदत द्यावी, कापसाला केवळ ४ हजार रूपये हमी भाव दिला आहे. कापसाला किमान सहा हजार रूपये भाव द्यावा, याशिवाय नापिकी व दुष्काळा मुळे शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्यात यावी, संत्रा उत्पादकांचेही नुकसान झाले आहे. त्यामळे या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रूपये अनुदान द्यावे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकरी आत्महत्या वाढल्याने शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ठोस उपायोजना कराव्यात, यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी पुष्पाताई बोंडे, सतीश उईके, गिरीश कराळे, केवलराम काळे, उडा उताणे, श्रीराम नेहर, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर महेंद्रसिंग गैलवार, विद्या देडू, बंडू देशमुल विलास पवार, प्रमोद दाळू, भानुदास चोपडे, बिटू मंग़रोळे, बच्चु बोबडे गणेश आरेकर उपस्थित होते.
भाजपा सरकारविरोधात कॉग्रेस धडकणार विधानभवनावर
By admin | Published: December 02, 2015 12:24 AM