अमरावती : समविचारी पक्षाचे सरकार स्थापन व्हावे, यासाठी काँग्रेससोबत आघाडीसंदर्भात शनिवारी बैठक आहे. मात्र, काँग्रेसकडे आम्ही लोकसभेचा जागा मागणार नाही, तर त्यांना जागा देऊ, अशी भूमिका भारिप- बमसंचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केली. आंबेडकर हे अमरावतीत एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता, ते लोकमतशी बोलत होते. आंबेडकर यांच्या मते, राज्यात बहुजन वंचित आघाडी ही कर्ती आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मिळविलेल्या विजयाने हरखून जाऊ नये. मध्य प्रदेश, राजस्थानात निसटता विजय असून, छत्तीसगडमध्ये अजित जोगी नको म्हणून पर्यायी काँग्रेसला मतदान झाले. तसेही भाजप, आरएसएसला उतरती कळा लागली आहे.येत्या काळात केंद्र व राज्यात आघाडीलाच बहुमत मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष एकच आहे. एकाचे सॉफ्ट तर दुस-याचे हार्ड हिंदुत्व आहे. त्यामुळे जनतेला हे दोन्ही पक्ष नको आहे. म्हणूनच आघाडीने झेप घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस केवळ वृत्तपत्रातून आघाडीबाबत चर्चा करते. खरे तर राज्याच्या काँग्रेस नेत्यांना केंद्रीय नेत्यांकडून आघाडी करण्यासाठी परवानगी आहे किंवा नाही? हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शनिवारच्या बैठकीत काँग्रेसला थेट जागा मागणार नाही तर देणार, असे आंबेडकर म्हणाले. एमआयएमसोबत अगोदरच राजकीय मैत्री झाली आहे. त्यांना दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आघाडीबाबत निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.तिस-या आघाडीत हे असतील पक्षराज्यात काँग्रेस, भाजप वगळता तिसरी आघाडी निर्माण होईल. यात भारिप- बहुजन महासंघप्रणित वंचित बहुजन आघाडी, सीपीएम, सीपीआय, जेडीयू, एमआयएम, जनता दल (एस), राष्ट्रीय जनता दल व समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्ष सामील होतील, असे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले. भीमा कोरेगाव येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले तरी अभिवादनासाठी लोक येतीलच. पोलीस छावणी निर्माण करणे म्हणजे ही सरकारची दहशत होय, अशी टीकादेखील प्रकाश आंबेडकरांनी केली.
काँग्रेसकडे जागा मागणार नाही, त्यांना देऊ- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 7:32 PM