पोहरा बंदी : अमरावती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पोहरा बंदी परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळा कोरोनाकाळात ओस पडल्या होत्या. मात्र, पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत उत्साह कायम आहे. विद्यार्थ्यांची ५० टक्के हजेरी नोंदविली गेली आहे.
कोरोनासंबंधी नियम पाळून पूर्वीप्रमाणे अध्ययन सुरू झाले. पोहरा जिल्हा परिषदेची मराठी शाळा सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना, कोरोना कालावधीत शाळेला कुलूप लागल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तरी कनेक्टिव्हिटी, संच उपलब्ध नसणे अशा विविध समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला होता.
पोहरा परिसरातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये आता शासननिर्णयानंतर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क, सॅनिटायजर, तापमापी या सर्व नियमांचे पालन करून प्रवेश दिला जात आहे.. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. काही शाळांच्या शिक्षकांनी स्वत: विद्यार्थ्यांना मास्क वाटप केले. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ५० टक्के हजेरी दिसून येत आहे. यामध्ये भानखेडा, बोडना, पिंपळखुटा, पोहरा, चिरोडी, सावंगा, लालखेड, मालखेड, भानखेड, मासोद, परसोडा, इंदला, कारला, कस्तुरा, मोगरा, गोविंदपूर येथील शाळआंचा समावेश आहे..
कोरोनासंबंधी सर्व खबरदारी घेऊन पोहरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोहन धर्माळे, शिक्षक अनिल सरदार, केशव बोनखडे, विद्या पहाडे, पद्मा सोमवंशी, शालिनी बोरखडे, रेणूका बदामे आदींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.