फोटो - १५एएमपीएच०२
----------------------------------------------------------------------------
७८ पैकी १८ इमारतींनाच परवानगी, महापालिका नगर रचना विभागात प्रकरणे प्रलंबित, अगोदर बांधकाम केले नंतर आर्किटेक्चर नेमले
गणेश वासनिक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तब्बल ६० इमारतींना बांधकाम परवानगी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती महापालिकेच्या नगर रचना विभागात ३१ वर्षांपासून ३६ इमारतींच्या बांधकाम परवानगीची प्रकरणे प्रलंबित आहेत. वृक्षकर आकारणीचा वाद पुढे आल्याने या इमारतींची बांधकाम परवानगी रखडली आहे.
अमरावती विद्यापीठात प्रशासकीय कार्यालय, विविध शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, कुलगुरूंचा बंगला, मुला-मुलींची वसतिगृहे, परीक्षा विभाग, परीक्षकांची वसतिगृहे, विचारधारा विभाग, केंद्रीय मू्ल्यांकन व परीक्षा विभाग, विद्युत कार्यालय, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांचे कार्यालय अशा एकूण ७८ इमारती असल्याच्या नोंदी आहेत. जलतरण तलावदेखील वेगळे आहे. काही नवीन इमारतींचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. महापालिका नगर रचना विभागाने बांधकाम नकाशाच्या आधारे सन २०१८ मध्ये विद्यापीठाच्या १८ इमारतींना परवानगी दिली. त्यावेळी विद्यापीठाने महापालिकेला ३० लाख रुपये बांधकाम परवानगी शुल्कदेखील भरले. मात्र, त्यानंतर महापालिका प्रशासनाने ३६ इमारतींच्या बांधकाम प्रकरणांना वृक्षकर लावण्याचा निर्णय घेतला. हा वृक्षकर विद्यापीठाला मान्य नाही. कारण विद्यापीठात दरवर्षी हजारांवर वृक्षारोपण होत असून, अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात येते. तेव्हापासून विद्यापीठाच्या इमारत बांधकाम परवानगीचा विषय रेंगाळला आहे. तथापि, विद्यापीठाने अगोदर बांधकाम केले, नंतर आर्किटेक्चर नेमल्याची बाब निदर्शनास आली आहे. तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी हा विषय मार्गी लावला, हे विशेष.
----------------
५० लाखांच्या उत्पन्नापासून महापालिका वंचित
विद्यापीठाने ३६ इमारतींच्या बांधकाम परवानगीची प्रकरणे नकाशा, आवश्यक कागदपत्रांसह महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे सादर केली आहे. या परवानगीतून महापालिका प्रशासनाला ५० लाखांचे उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती आहे. मात्र, तांत्रिक बाबी, वृक्षकर या विषयांवरून गत ३१ वर्षांपासून इमारत बांधकाम परवानगी शुल्काचे भिजतघोंगडे कायम आहे.
---------
कोट
३६ इमारतींच्या बांधकाम परवानगीसाठी वृक्षकर आकारून डिमांड पाठविण्यात आली होती. वृक्षारोपणासह संगोपन, संवर्धन या विषयात विद्यापीठ आघाडीवर असून, दरवर्षी एक कोटी रुपये झाडांच्या देखभालीवर खर्च होतात. जो निकष यापूर्वी १८ इमारतींना लावला, तोच निकष ३६ इमारतींच्या बांधकाम परवानगीसाठी असावे, असे पत्र महापालिका प्रशासनाला दिले आहे.
- शशिकांत रोडे, कार्यकारी अभियंता, अमरावती विद्यापीठ
-------------
विद्यापीठातील इमारत बांधकाम परवानगीचा विषय कोरोनाकाळात मागे पडला, हे खरे आहे. मात्र, येत्या आठवड्यात याविषयी बैठक घेऊन वृक्षकर आकारणीबाबत काही मार्ग काढता येईल. उत्पन्नवाढीचा विषय असला तरी नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
- प्रशांत रोडे, आयुक्त, अमरावती महापालिका