धारणी : शहरालगत ग्रामपंचायत दिया सांझा अंतर्गत तलाई येथील शेत सर्वे नंबर १५४/१ ज्याचे नवीन सर्वे नंबर ३५/२ असे असून एकूण क्षेत्रफळ १ हेक्टर ६२ आर आहे. ही जमीन अमरावती बुऱ्हाणपूर मुख्य मार्गालगत उत्तरेकडे आहे. यावर विवादितरीत्या बोगस कागदपत्रांच्या आधारे फेरफार घेतल्याचे प्रकरण उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रलंबित असताना मशिदीचे निर्माण कार्य सुरू आहे.
या शेतीचे अकृषक भूखंड पाडून संबंधित मालकाने काही भूखंड विकले. त्यातच एका मशिदचे निर्माण कार्य वादात सापडले आहे. शासनाच्या परवानगीशिवाय धार्मिक स्थळांची निर्मिती करू नये, असे नियम असताना विनापरवानगी या अभिन्यासात मशिदचे निर्माण कार्य सुरू आहे. सुरुवातीला केवळ इमारत निर्माण झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, कालांतराने तेथे मशिदीप्रमाणे बांधकामातील इमारतीवर मिनार चढविण्यात आले. एका विशिष्ट धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे आतील रचना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे हे धार्मिक स्थळ परिसरातील नागरिकांसाठी एक शब्दकोडे ठरत आहे. या परिसरात मुस्लिम समाजाचे बांधव यांची संख्या नगण्य असताना मशिदची आवश्यकता का, असा सवाल परिसरातील नागरिक विचारू लागले आहे.
याबाबत ग्रामपंचायत दिया येथील प्रशासनाकडे विचारणा केली असता, ग्रामपंचायतकडे सर्वे नंबर १५४/१ चे अभिन्यासात रूपांतर झाल्याचे कोणतीही नोंद नसून, ज्या जागेवर धार्मिक स्थळाची निर्मिती होत आहे त्याचीसुद्धा परवानगी ग्रामपंचायत प्रशासनाने दिली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बॉक्स -
कॅम्प परिसरालगतच येथील धार्मिक सौहार्द कायम ठेवण्यात यावे व कोणत्याही प्रकारचे वादविवाद निर्माण होऊ नये, याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबंधित धार्मिक स्थळ बांधकामाची चौकशी करण्यात येईल.
- दुर्गाताई बिसंदरे, ग्रामपंचायत सदस्य, दिया.