परतवाडा : कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ ठरल्यानंतर संचारबंदीतही देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात ३० ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये आले.
संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी २३ फेब्रुवारीला सरपंच पद्मा सोळंके, उपसरपंच शैलेश म्हाला, सचिव ताज पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल सरोदे व रावसाहेब रहाटे यांनी स्वत: या ३० बांधकामस्थळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्या बांधकामस्थळी उपस्थितांना लागलेल्या संचारबंदीची, कोरोनाच्या उद्रेकाची आणि संभाव्य धोक्याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगत पुढील आदेशापर्यंत बांधकाम थांबविण्यास सूचना संबंधितांना दिल्या.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाहीर मुनादीही दिली गेली. बांधकाम बंद ठेवा. पुढील आदेशापर्यंत बांधकाम सुरू दिसल्यास दोन महिन्यांकरिता परवानगी रद्द करण्यात येईल. सोबतच दहा हजारांचा दंडही ठोठावण्यात येईल. पुढील १ मार्चपर्यंत कुठलीही बाहेरच्या व्यक्ती, लोकांना देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात येता येणार नसल्याचे या मुनादीतून जाहीर केले गेले. यातच अचलपूर तहसीलदार मदन जाधव यांनीही देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्राला भेट दिली. परिस्थितीसह उपाययोजनांची माहिती घेत आवश्यक त्या सूचना त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेत.
बॉक्स
बहिरम मंदिर बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता, खबरदारीची उपाययोजना म्हणून बहिरमचे मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. बहिरमबाबाच्या दर्शनाला १ मार्चपर्यंत कुणीही येऊ नये, यासाठी मंदिरावर येणारा मार्ग व पायरीवरील मार्ग बंद करण्यात आला असल्याचे विश्वस्त मंडळाने कळविले. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शासनाच्या निर्देशानुसार हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते.