लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गत काही दिवसांपासून शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांसोबतच बाधितांचे संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढविण्यावर जिल्हा परिषद भर देणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांनी सोमवारी दिली.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये कोरोना संक्रमित रूग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. यापूर्वी मेळघाटात अल्प प्रमाणात असलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांसह अन्य तालुक्यांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ग्राम दक्षता समिती व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसेवक आदींच्या माध्यमातून गावस्तरावर गावात विनामास्क फिरणारे, फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मास्क, फिजिकल डिस्टन्स, नियमित हात धुणे यासारख्या त्रिसुत्रीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. सोबतच ज्या गावात कोरोना संक्रमित आढळून आले आहेत, अशा ठिकाणच्या कन्टेनमेंट झोन परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व चाचण्या वाढविण्यावर आरोग्य विभाग भर देणार आहे. सोबतच ग्रामीण भागातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. याकरिता जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
कोट
ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाची गती वाढविण्यावर जिल्हा परिषदेचा भर राहणार आहे.
- अविष्यांत पंडा
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद