जलजन्य आजार बळावण्याची शक्यता, प्राधिकरणाचा नागरिकांच्या जिवाशी खेळ
येवदा : गत पाच ते सहा दिवसांपासून दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अतिसार, टायफाॅईड, काविळ, डायरिया यांसारख्या जलजन्य आजाराचा धोका येथील नागरिकांना संभवत आहे.
जवळपास २० हजार लोकसंख्या असलेल्या येवदा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जलजन्य आजारांमध्ये वाढ होण्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण असतानाच दूषित पाण्यामुळे वाढणारे रुग्ण हे आरोग्य विभागाची चिंता वाढवित आहेत.
धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्याचे क्लोरीनेशन होणे गरजेचे आहे. येवदा येथे क्लोरिनेशन प्लांट असतानासुद्धा येथील पाणी आरोग्य विभागाने तपासले तेव्हा पाण्यात क्लोरिनचे प्रमाण आढळलेच नाही. तसा अहवाल आरोग्य विभागाने प्राधिकरणाकडे पाठविला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळॆ हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात नकुल सोनटक्के यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध नागरिकांच्या जिवाशी खेळ करणे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जीवन प्राधिकरणाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे नकुल सोनटक्के यांनी सांगितले.
--------------------
येवदा येथील पाण्याची तपासणी केली असता, ते गढूळ होते. त्यात क्लोरीन आढळले नाही. तसा निगेटिव्ह रिपोर्ट ग्रामपंचायत व प्राधिकरणाला पाठविला आहे. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका संभवतो. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे.
- विनोद दरोकार, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, येवदा
------------------
धरण क्षेत्रात खूप पाऊस झाल्याने संपूर्ण दर्यापूर व अंजगाव तालुक्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी शुद्धीकरण करणे सुरू आहे. काही दिवसांमध्ये परिस्थिती सुधारेल.
- अभय देशमुख, सहायक अभियंता, मजीप्रा, दर्यापूर
--------------