नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाचडोंगरी येथे शेतातील खुल्या विहिरीचे पाणी सेवन केल्याने अतिसारातून दोघांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा अधिक आदिवासींना लागण झाली. त्यांच्यावर काटकुंभ आरोग्य केंद्र, चुरणी ग्रामीण रुग्णालय व गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य विभागाच्यावतीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.गंगाराम नंदराम धिकार (२५), सविता सहदेव अखंडे (३०) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉ. साहेबराव धुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, डॉ विठ्ठल बासरकर, डॉ. रामदेव वर्मा यासह कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात ३० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करीत आहेत. पाचडोंगरी येथील रुग्ण साहेबलाल पथोटे (४५), इमुबाई पंडोले (५५), माला अखंडे (२२), दया कासदेकर (१९), आशा धिकार (२२), सुगाय अखंडे (३५), रानी बेठेकर (२९), रामकली तोटे(३५), रिचमू बेठेकर (२७), काली धांडे (४५), हरिचरण बेठेकर (३०), हिरकाय धांडे (४५), लीलावती बेठेकर (४०), जाटू बेठेकर (७०), लखमू बेठेकर (३९), सुरेश अखंडे (२१), रामलाल धांडे (३६), फुलवंती अखंडे (२५), साहिल बचले (१३), बाबूलाल बेठेकर (२३), आशिष कसदेकर (२०), मनोज सुरजे (३३), रवी पाथोटे (२५), इमला अखंडे (४३), शिवकली हरसुले (२७), श्रेया अखंडे (३) वर्षे चिमुकलीसह आदींवर चुरणी, काटकुंभ तसेच पाचडोंगरी येथील शाळेत उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, मेळघाट अध्यक्ष पीयूष मालवीय, विक्की राठोड, सरचिटणीस राहुल येवले व कार्यकर्त्यांनी तत्काळ दखल घेतली. दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान तळ ठोकून आहेत, तर डॉ. पाचडोंगरी गावात डॉ. स्वाती राठोड, पंकज माहुलकर, मनोज दवे, गेडाम, काटकुंभ येथे डॉ. अंकित राठोड व अधिक कर्मचारी आरोग्याची धुरा सांभाळत आहेत. कोयलारी येथील पाणीपुरवठ्याची वीज चार दिवसांपूर्वी कापण्यात आल्याने पाचडोंगरी येथे अतिसराने थैमान घातल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
‘लोकमत’ने प्रकाशित केले होते वृत्तदूषित पाण्यामुळे आदिवासी नागरिकांसह कुपोषित बालकांचा जीव धोक्यात येतो. खंडित विद्युत पुरवठ्याच्या दुष्परिणामाबाबत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित केले होते. मध्य प्रदेशच्या भैसदेही येथून जारिदा सब स्टेशनला पुरवठा केला जातो.
दूषित पाण्याची विहीरपाचडोंगरी गावाला कोयलारी येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, चार दिवसापासून वीज नसल्याने तो बंद आहे. गावानजीक भोगेलाल अखंडे यांचे शेत आहे. त्या शेतातील विहिरीतील पाणी पिण्यासाठी गावकऱ्यांनी मंगळवारी, बुधवारी भरले. त्याचा वापर केला. बुधवारी रात्रीपासून अचानक पोटदुखी, हगवणीचा त्रास झाला. अख्खे गाव आजारी पडले त्यात दोघांचा मृत्यू झाला.
वीज नाही, जलशुद्धीकरणाला फाटाचार दिवसांपासून परिसराचा वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना नदी, नाल्याचे पाणी आणावे लागत आहे. पाचडोंगरी येथील नागरिकांनी शेतातील खासगी विहिरीतून पाणी भरले. ब्लिचिंग पावडर व जलशुद्धीकरणाची प्रक्रिया न करता ते वापरले गेल्याने संपूर्ण गावात अतिसाराची लागण झाली. सायंकाळपासूनच गावात उलटी, हगवणची साथ सुरू झाली.
धारणीत नवसंजीवनीची बैठक आदिवासींचा टाहोमेळघाटातील आरोग्य समस्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उद्भवते. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी येथे गुरुवारी नवसंजीवनी योजनेची आढावा बैठक सुरू असतानाच दूषित पाण्याने दोघांचा मृत्यू, तर शंभरावर आजारी पडल्याचा प्रताप घडला. आदिवासींच्या आरोग्य समस्यांसाठी नवसंजीवनी आढावा बैठक घेतली जाते, हे विशेष.
आणि दूषित पाण्याचे फलक लागलेपाचडोंगरी व कोयलरी गावात अतिसाराची लागण झाल्यानंतर गुरुवारी दुपारी प्रशासनाची झोप उघडली आणि विहिरीनजीक पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावण्यात आला. या गावांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जात असल्याची माहिती चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांच्याकडून देण्यात आली.
दूषित पाण्यामुळे लागण झाल्याचे प्राथमिक पुढे आले आहे. गावातच कॅम्प उघडला असून, काटकुंभ, चुरणी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे. चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याचे नागरिकांनी सांगितले. दोघांचा मृत्यू झाला आहे- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा
चार दिवसांपूर्वी पाचडोंगरी ग्रामपंचायतमध्ये माझी नियुक्ती झाली आहे. गावाचा विद्युत पुरवठा खंडित आहे. ब्लिचिंग पावडरसुद्धा आणले आहे. खासगी विहिरीचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने हा प्रकार घडला असावा. - व्ही. व्ही. सोळंके, ग्रामसेवक
ग्रामपंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा आहे. आदिवासींच्या जिवाशी खेळ करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा. - पीयूष मालवीय सदस्य, रुग्ण कल्याण समिती, मेळघाट
पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश असतात. दूषित पाणीपुरवठा आदिवासींच्या जिवावर उठला आहे. दोघांच्या मृत्यूला प्रशासनाची हलगर्जी कारणीभूत आहे. दोषी असलेल्या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे. - सहदेव बेलकर, अध्यक्ष, काँग्रेस (मेळघाट)