नीलेश भोकरे/करजगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन दिवस कर्तव्यावर रुजू झालेले मौजा गोविंदपूर सांझाचे तलाठी सातत्याने गैरहजर राहत असल्याचे पुढे आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा तलाठ्यांकडून अवमान होत असल्याच्या प्रतिक्रिया यामुळे व्यक्त होत आहेत.
चांदूर बाजार तालुक्यातील मौजा गोविंदपूर साझाकरिता तलाठी म्हणून घुलक्षे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, ते आपल्या सांझाला सतत गैरहजर राहिल्याने गोविंदपूर येथील शेतकरी अरविंद धामडे यांनी मंडळ अधिकाऱ्याकडे २०१८ मध्ये तक्रार केली. प्रकरण निकाली न निघाल्याने तहसीलदारांकडे नेण्यात आले. त्यांच्या आदेशाला तलाठ्यांनी केराची टोपली दाखविली. यामुळे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली गेली. जिल्हाधिकाऱ्यांच्या २९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या पत्रावरून चांदूर बाजारच्या तहसीलदारांनी आदेश दिल्याने दोन दिवस तलाठी घुलक्षे हे मौजा गोविंदपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहिले. यानंतर कूलर वा पंखा नसल्याचे कारण देत सांझावरून सतत गैरहजर राहिले. ते अद्यापपर्यंत गावाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी यांना शालेय कामाकरिता तसेच वृद्धांना, विधवा, निराधारांना तहसीलकरिता लागणारे दाखले मिळविण्याकरिता तलाठ्याला गाठण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर चकरा माराव्या लागतात. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ही फरफट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
----------
मी शेतकरी आहे. २०१८ ला लेखी तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे दोन दिवस तलाठी आले. यानंतर कूलर, पंखा नसल्याचा बहाणा करीत सातत्याने गैरहजर आहेत. यामुळे विद्यार्थी, शेतकरी यांना दाखले मिळविण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा.
- अरविंद धामडे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद पूर