अमरावती : कोरोनाकाळात परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. त्यामुळेच सहा सुवर्णपदके, एक रौप्य, रोख पारितोषिक मिळविता आल्याचे अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाची विद्यार्थिनी सारिका वनवे यांनी सांगितले.
अमरावती विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षांत समारंभात मुलींमधून सर्वाधिक पदके पटकाविण्याचा बहुमान मिळाल्यावर सारिका वनवे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसाेपंत तालुक्यातील आसोला या गावाच्या त्या रहिवासी आहेत. त्यांनी एम.एड्. केले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतानाच नेट-सेट करता आले. आता पीएच.डी.ला प्रवेश आहे. उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी काही तरी करण्याच्या इच्छेतून ‘पश्चिम विदर्भातील पारधी समाजाची संस्कृती व त्याचा लोकवाङ्याचा अभ्यास’ या विषयावर संशोधन त्या करणार आहेत.
सुवर्णझळाळीमध्ये गुरुजनांचे मोठे पाठबळ मिळाले. अभ्यास किती तास केला, त्यापेक्षा तो आत्मसात किती झाला, हे महत्वाचे आहे. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन केल्यास यश मिळते, असे सारिका म्हणाल्या. विद्यापीठात शिक्षणाची कोरोनाकाळात भयानक दशा झाल्याचे दिसून आले. या काळातही निरंतर अभ्यास, वाचन सुरूच होते. त्यामुळे परीक्षेत कुठलीही अडचण गेली नाही, असे सारिका वनवे म्हणाल्या. प्राध्यापकी पेशातून उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.