वरूड : नगर परिषदेत अनेक वर्षांपासून शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम घेतलेल्या कंत्राटदार संस्थेने १ जुलैपासून ११० कंत्राटी सफाई कामगारांना कमी केले. यामुळे या सफाई कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर सफाई कामगारांना पूर्ववत आठ दिवसांत रुजू केले नाही, तर बेमुदत उपोषणाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला.
वरूड शहराच्या साफसफाईकरिता नगर परिषदेने कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले होते. शहरातील घनकचरा, नाल्या सफाई आदी कामे सुरळीत सुरू होती. परंतु, घनकचरा व्यवस्थापनाकरिता एका खासगी संस्थेला निविदा दिली असून, संस्थेने ११० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून कमी केले. ११० सफाई कामगारांवर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटदार संस्थेने केवळ २४ कामगारांना कामावर ठेवल्याची माहिती आहे. उर्वरित कामागारांना कामावर घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी दिला आहे.