अमरावती : एका ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक १ येथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून कानशिलात लगावून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना ६ जुलै रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागात घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा नोंदविला.
अनिकेत फाटे(ठेकेदार) (रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अतिश राजू बोयत (२७, रा. हरिओम कॉलनी साईनगर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुरुवारी गाडगेनगर पोलिसांनी भादंविची कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा नोंदविला. फिर्यादी हे सरकारी कर्मचारी असून आरोपी हा उपअभियंता संतोष वैद्य यांच्या केबीनमध्ये डोकावून कान देऊन चर्चा ऐकत होता. त्याला फिर्यादीने हटकले असता, आरोपीला फिर्यादी हे सरकारी कर्मचारी असल्याचे लक्षात असूनही शिवीगाळ करून कानशिलात लगावली. वरून धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.