क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी : ट्रक, जेसीबी ठेवण्यासाठी आहे का मैदान ?दर्यापूर : नगरपालिकेच्या विशेष निधीतून येथील बसस्थानक चौकापासून तर शिव्हील लाईन पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व नालीचे बांधकामाचे काम १३ व्या वित्त आयोगांतर्गत सव्वा कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे. हे काम सुरेश चांडक हा कंत्राटदार करीत आहे. परंतु कामासाठी आणण्यात आलेल्या ट्रक, गिट्टी, रेती, व जेसीबी येथील कन्या शाळेच्या मैदानात ठेवून या कंत्रदाराने मैदानाची वाट लावली आहे. त्यामुळे शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. दर्यापूर हे विविध खेळांचे माहेर घर आहे. या ठिकाणी क्रिकेटचे विदर्भस्तरीही लेदर बॉलचे सामने खेळले जायाचे, दर्यापुरातही कबड्डीचे राज्यस्तरीही सामने येथे खेळले जायचे, आजही या मैदानावर अनेक खेळाडू विविध खेळांचा सराव करतात. परंतु जेव्हापासून हे मैदान जिल्हा परिषदेने नगरपालिके ला हस्तांतरित केले, तेव्हापासून या मैदानाची दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी नगरपालिकेची शाळासुध्दा आहे. येथे विद्यार्थी खेळतात. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून येथील सुरेश चांडक नामक ठेकेदाराने हे मैदान स्वत:च्या स्वार्थासाठी कुठलीही परवानगी न घेता वापरायला घेतले आहे. या मैदानात रस्ता तयार करण्यासाठी आणण्यात आलेले तीन ते चार ट्रक रोज ये-जा करतात. येथे जेसीबी ठेवण्यात आला आहे. रेती, गिट्टी व इतर साहित्य ठेवले आहेत. त्यामुळे हे मैदान पूर्णपणे उखडले आहे. येथे विविध खेळांचा सराव करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे येणे बंद झाले आहे. मॉर्निंगवॉकसाठी रोज या मैदानावर लहान मुले, विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक येत होते. त्यांचा येथील वावर बंद झाला आहे. या कंत्राटदाराला अशी नियमबाह्य वागण्याची परवानगी कुणी दिली. जर अशाप्रकारे सर्वांच्या डोळ्यांदेखत हा कंत्राटदार राजोरोसपणे दादागिरी व दंबगगिरीने करीत असेल तर या कंत्राटदारावर नगरपालिकेने कारवाई का करू नये? नगरपालिकेचे मैदान खराब करण्याचा अधिकार या कंत्राटदाराला दिला कुणी, हे सर्व प्रश्न दर्यापुरातील शेकडो क्रीडाप्रेमींनी उपस्थित केले आहेत. शहरातील क्रीडा संकुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे अनेक वर्र्षांपासून एकमेव मैदान दर्यापुरातील युवकांसाठी व खेळाडुंसाठी हेच आहे. येथे अनेक खेळाडू घडलेत व त्यांनी अनेकांना घडविले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने हे मैदान सदर कंत्राटदारांकडून सुस्थितीत करून घ्यावे व त्यावरील साहित्य त्वरित या मैदान परिसरातून उचलण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
कंत्राटदाराने लावली कन्या शाळेच्या मैैदानाची वाट
By admin | Published: September 30, 2016 12:29 AM