अमरावती : केवळ आपल्या कुटुंबातीलच नव्हे तर परिसरातील गावातील बालकांचे संरक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्वांनी बाल संरक्षण कायदे डोळसपणे समजून घेऊन बालकांच्या संरक्षणासाठी गावोगाव स्थापित समितीचे कार्य पुढे न्यावे व जनजागृती करावी, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत करण्यात आले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत बाल संरक्षण कक्षामार्फत गावनिहाय ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून त्याबाबत पोलीस पाटील व अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणासाठी कार्यशाळा २० सप्टेंबर रोजी पार पडली. तहसीलदार संतोष काकडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे, नायब तहसीलदार महेश रासेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय दुर्गे, बालकल्याण समितीचे डॉ. दिलीप काळे, बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. माधव दंढाळे, छाया मिश्रा, बालकल्याण समिती सदस्य मीना दंढाळे, अंजली घुलक्षे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यावेळी उपस्थित होते. विविध ठिकाणच्या अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. बालकांची सुरक्षितता व निराधार मुलांना आधार मिळवून देण्याच्या दृष्टीने बाल संरक्षण समिती कार्यरत आहे. मुलांच्या सुरक्षेच्या व विकासाच्या दृष्टीने काम करणारी ही प्रभावी यंत्रणा असल्याचे तहसीलदार काकडे म्हणाले. गावोगावी या समितीचे काम चांगले होण्यासाठी प्रशिक्षणातील सर्व बाबी समजून घ्याव्यात व बाल संरक्षणाबाबत भारी जनजागृती करावी, ग्राम समितीच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे बाल संरक्षणाचे कार्य होऊ शकते, असेही डॉ. काळे यांनी सांगितले.